रेल्वेचे बांधकाम कार्यालय जिल्ह्यात आणण्याचे प्रयत्न सुरू
By Admin | Updated: April 5, 2015 01:47 IST2015-04-05T01:47:30+5:302015-04-05T01:47:30+5:30
भारतीय रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय सध्या बिलासपूरमध्ये आहे.

रेल्वेचे बांधकाम कार्यालय जिल्ह्यात आणण्याचे प्रयत्न सुरू
गडचिरोली : भारतीय रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय सध्या बिलासपूरमध्ये आहे. ते गडचिरोली जिल्ह्यात आणण्यासाठी केंद्र सरकारस्तरावर खासदार अशोक नेते यांचा पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या दोघांचीही भेट घेऊन त्यांना पत्रही दिले आहे.
गडचिरोली हा देशातील २५ अतिमागास जिल्ह्यात समाविष्ट असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात रेल्वेच्या दळणवळणाचे जाळे केवळ १९ किमीचे आहे. नक्षल कारवायांनी प्रभावित असलेल्या या जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वेच्या दळणवळणाचा साधन निर्माण होणे आवश्यक आहे. या जिल्ह्यात असलेले व दक्षिणपूर्व रेल्वे अंतर्गत येणारे वडसा हे रेल्वे स्थानक बिलासपूर झोनमध्ये मोडते. मागील ३०-४० वर्षांपासून वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या रेल्वे मार्गासाठी २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात ८० कोटी रूपयांची तरतूद केंद्र सरकारने करून दिलेली आहे व राज्य सरकार आपला ५० टक्के वाटा देणार असल्याचे राज्य सरकारने पंतप्रधानांना कळविले आहे. वडसा-गडचिरोली हा नवीन रेल्वे मार्ग व नागपूर-नागभिड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातूनच होणार आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथे असलेले रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे युनिट (कार्यालय) वडसा येथे हलविण्यात यावे, अशी मागणी खासदार नेते यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्र व्यवहारही त्यांनी केंद्र सरकारकडे केला आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास खासदार नेते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)