कचऱ्याच्या ढिगाऱ्यांत हरविले सिरोंचा
By Admin | Updated: January 11, 2015 22:51 IST2015-01-11T22:51:58+5:302015-01-11T22:51:58+5:30
ब्रिटिशकालीन जिल्ह्याचे ठिकाण म्हणून एकेकाळी नावलौकिक असलेल्या सिरोंचा शहराच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे वाढतच चालले आहेत.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यांत हरविले सिरोंचा
नागभूषणम चकिनारपुरवार - सिरोंचा
ब्रिटिशकालीन जिल्ह्याचे ठिकाण म्हणून एकेकाळी नावलौकिक असलेल्या सिरोंचा शहराच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे वाढतच चालले आहेत. त्याचबरोबर नाल्यांचा उपसा न झाल्याने सांडपाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरायला लागले आहे. याचा प्रचंड त्रास सिरोंचावासीयांना सहन करावा लागत आहे.
सिरोंचा ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ सदस्य असून पाच वार्ड आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या या शहराला विशेष महत्त्व आहे. ब्रिटिश कालावधीत सिरोंचा शहरातूनच सभोवतालच्या परिसराचे प्रशासन चालविले जात होते. आजही या शहरात ब्रिटिशांच्या आठवणी जपणाऱ्या अनेक वस्तू, कलाकृती व वास्तू आहे. त्यामुळे या शहराविषयी गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भ व तेलंगणा राज्यातील नागरिकांना विशेष आकर्षण आहे. सिरोंचावरूनच तेलंगणातील कालेश्वरला जाता येत असल्याने दरदिवशी अनेक नागरिक सिरोंचा येथे येतात. त्यामुळे सिरोंचा शहराशी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे भावनिक नाते जुडले आहे.
सिरोंचा शहराचे हे वैभव ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे लुप्त होत चालले आहे. सिरोंचा तालुक्यातील बहुतांश कर्मचारी सिरोंचा येथे राहूनच सेवा बजावतात. परिणामी या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
ग्रामपंचायतीने प्रत्येक वार्डात नाल्या तयार केल्या असल्या तरी या नाल्यांचा मागील दोन वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून सांडपाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबद्दल नागरिकांनी ग्रामपंचायतीला विचारणा केली असता, मजुरच मिळत नसल्याचे कारण दिले जात होते. नागरिकांनी नाली उपसण्याविषयी रेटा लावून धरल्यानंतर ग्रामपंचायतीने तेलंगणा राज्यातील मजूर बोलवून नाल्यांचा उपसा सुरू केला आहे. मात्र ज्या ठिकाणी जास्त गाळ आहे, त्या ठिकाणचा उपसा न करता अतिशय कमी गाळ असलेल्या नाल्यांचा उपसा केला जात आहे. पूर्णपणे नाल्या उपसल्या जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
शहरात प्रत्येकच वार्डात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. सदर कचरा उचलण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. या कचऱ्यावर दिवसभर डुकरे राहत असल्याने त्यांचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सभोवताल पसरलेला कचरा व नालीमध्ये साचलेले सांडपाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना ग्रामपंचायतीचे अधिकारी व पदाधिकारी टक्केवारीमध्ये गुरफटून असल्याचे दिसून येत आहे. ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शहराच्या विकासाबाबत व येथील समस्या सोडविण्यासाठी योग्य समन्वय नसल्याने सिरोंचा शहराची दुर्दशा झाली आहे.