ट्रकची ट्रॅक्टरला धडक, आठ जखमी
By Admin | Updated: May 1, 2016 01:08 IST2016-05-01T01:08:37+5:302016-05-01T01:08:37+5:30
आरमोरीकडून गडचिरोलीकडे पोकलँड मशीन घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने सदर दोन्ही वाहने कठाणी नदीच्या पुलावरून खाली कोसळली.

ट्रकची ट्रॅक्टरला धडक, आठ जखमी
कठाणी नदीच्या पुलावरील घटना : दोन्ही वाहने नदीपात्रात कोसळली
गडचिरोली : आरमोरीकडून गडचिरोलीकडे पोकलँड मशीन घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने सदर दोन्ही वाहने कठाणी नदीच्या पुलावरून खाली कोसळली. यात आठ जण जखमी झाले. सदर घटना शनिवारी सकाळी ५.३० वाजता सुमारास गडचिरोलीपासून तीन किमी अंतरावर घडली.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ट्रकमधील ट्रकचालक सतीश मल्लेश बंडू (३२) रा. गोदावरी कन्ही ता. जि. करिमनगर, ट्रक क्लिनर शेख पाशा शेख लाल मोहम्मद (४५) रा. रामक्रिष्णपूर ता. जि. आदिलाबाद, पोकलँडचालक दश क्रिष्णा राजय्या सेमाला (१९), नरेश रामय्या सेमाला (२६) रा. कोरेम ता. गाईदपल्ली जि. करिमनगर तसेच ट्रॅक्टरवरील ट्रॅक्टरचालक प्रफुल मधुकर मंगर (२५), नीलकंठ नामदेव चौधरी (३८), सुशील दिवाकर बांगरे (२४), संतोष नत्थू बांगरे (३५) सर्व राहणार अडपल्ली ता. गडचिरोली यांचा समावेश आहे.
या अपघातात ट्रकवरील प्रल्हाद राजय्या सेमाला (२७) रा. कोरेम ता. गाईतपल्ली जि. करिमनगर व ट्रॅक्टरवरील प्रमोद दिवाकर म्हशाखेत्री (३०), जगदीश रामदास चौधरी (३०) दोघेही रा. अडपल्ली हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रकचालक सतीश मल्लेश बंडू व ट्रॅक्टरचालक प्रफुल मधुकर मंगर हे दोघेजण गंभीर आहेत. जखमी आठही जणावर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
एपी-२९-पीए-७८२८ क्रमांकाचा ट्रक पोकलँड मशीन घेऊन वर्धेवरून करिमनगरसाठी निघाला. आरमोरीवरून गडचिरोलीकडे येत असताना एमएच-३३-एफ-५७४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिली. सदर अपघात इतका भिषण होता की, भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक देऊन जवळपास ३० फुटापर्यंत ट्रॅक्टरला फरफटत नेले. त्यानंतर दोन्ही वाहन पुलाच्या खाली नदीपात्रात कोसळले. सदर दोन्ही वाहने प्रचंड क्षतीग्रस्त झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली व अडपल्ली, गोगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या पाहण्यासाठी गर्दी केली. या अपघाताची नोंद गडचिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे. सदर पुलावर यापूर्वीही अनेकदा अपघात घडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)