कोंढाळानजीक ट्रक पलटला
By Admin | Updated: July 9, 2014 23:27 IST2014-07-09T23:27:50+5:302014-07-09T23:27:50+5:30
कोंबड्या घेऊन येणारा ट्रक देसाईगंज-गडचिरोली मार्गावर कोंढाळानजीक शेतात पलटून चालक गंभीर झाल्याची घटना बुधवारी घडली.

कोंढाळानजीक ट्रक पलटला
चालक जखमी : दोन तास चालक वाहनात अडकला
देसाईगंज : कोंबड्या घेऊन येणारा ट्रक देसाईगंज-गडचिरोली मार्गावर कोंढाळानजीक शेतात पलटून चालक गंभीर झाल्याची घटना बुधवारी घडली.
या अपघातात ट्रक चालक महेश नरूले (२७) हा जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार एमएच-३४-एबी-५६८७ या क्रमांकाचा ट्रक विदेशी कोंबड्या घेऊन चंद्रपूरवरून देसाईगंजकडे गडचिरोलीमार्गे येत होता. दरम्यान कोंढाळानजीक ट्रक चालक महेश नरूले यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने सुरूवातीला झाडाला धडक दिली. त्यानंतर लगतच्या शेतात पलटला. यात ट्रकचालक जखमी झाला. सदर धडक इतकी भीषण होती की, ट्रकचे दोन्ही चाक बाहेर निघून मागच्या बाजुला पडले. ट्रकचालक कॅबीनमध्ये फसला होता. त्याच्यासोबत त्याचे तीन सहकारी होते. त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची माहिती दिली.
देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल दयलानी यांनी माहिती मिळाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यासोबत वेल्डींग कटर घेऊन घटनास्थळ गाठले. त्यानंतर पोलीस ठाण्यातून जनरेटर मागविण्यात आले. त्यानंतर तब्बल २ तास प्रयत्न करून वाहनाला कापून फसलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले. सदर अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली होती.
ट्रकचालक महेश नरूले यांचेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. ट्रकचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)