ट्रक-बसची धडक, बसचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:21 IST2017-08-18T00:20:55+5:302017-08-18T00:21:24+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे १६ आॅगस्ट रोजी बुधवारला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या नागरिकांना.......

ट्रक-बसची धडक, बसचालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे १६ आॅगस्ट रोजी बुधवारला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या नागरिकांना नागभिड तालुक्याच्या गोंविदपूर परिसरात सोडल्यानंतर परत येत असलेल्या बसची व विरूद्ध दिशेने येणाºया ट्रकची आनंदनगर वसा जवळ समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक महादेव श्यामराव देशेवार (५५) यांचा मृत्यू झाला आहे.
महादेव देशेवार हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील मोहझरी येथील रहिवासी असून ते गडचिरोली आगारात चालक पदावर कार्यरत होते. ते आपल्या कुटुंबियासमवेत गडचिरोली येथील रामनगर परिसरात वास्तव्याने राहत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिमूर क्रांती दिनानिमित्त बुधवारी चिमूर येथे आले होते. त्यांच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथून राज्य परिवहन महामंडळाच्या १२ बसमधून नागरिकांना चिमूर येथे नेण्यात आले होते. कार्यक्रमानंतर परतीच्या वेळी रात्री ९ वाजता एमएच ४० वाय ५५३६ क्रमांकाची बस आणि एमएच ४० एके ०७५७ क्रमांकाच्या ट्रकची वसानजीक समोरासमोर धडक झाली. यामध्ये बसचालक महादेव देशेवार गंभीर जखमी झाले. त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचा चुराडा झाला असून ट्रक व महामंडळाची बस प्रचंड क्षतिग्रस्त झाली. या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. सदर अपघातस्थळ आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्षतिग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजुला केला. तर गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. सदर अपघातातील ट्रक चालक व मालक कोण याची माहिती गडचिरोली तसेच आरमोरी पोलिसांकडून वृत्त लिहिस्तोवर मिळाली नाही.
गडचिरोली आगारात पसरली शोककळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चिमूर येथील सभेकरिता प्रासंगिक करारांतर्गत महामंडळाच्या गडचिरोली आगाराची बस देण्यात आली होती. सदर बसवर चालक म्हणून महादेव देशेवार यांची ड्युटी लावण्यात आली. सभा आटोपल्यानंतर बसचालक देशेवार यांनी नागभीड तालुक्यातील नागरिकांना संबंधित ठिकाणी सोडले. येथून विनाप्रवासी बस गडचिरोलीकडे आणत होते. दरम्यान वसानजीक या बसला भिषण अपघात घडला. यात बसचालक देशेवार मृत्यू पावले. देशेवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता गडचिरोली आगारात गुरूवारी सकाळी पोहोचताच बसचालक व वाहकामध्ये शोककळा पसरली. अनेक बसचालक व वाहकांना अश्रू अनावर झाले नाही. त्यामुळे गडचिरोली आगारातील काही बसफेºया विलंबाने सोडण्यात आल्या.