धान पोते घेऊन जाणारा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 01:20 IST2016-02-04T01:20:19+5:302016-02-04T01:20:19+5:30
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या धानाचे पोते घेऊन जाणारा ट्रक उलटूून ट्रकमधील चालक, ....

धान पोते घेऊन जाणारा ट्रक उलटला
दोन जखमी : वैरागड-मानापूर मार्गावर अपघात
वैरागड : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या धानाचे पोते घेऊन जाणारा ट्रक उलटूून ट्रकमधील चालक, वाहक जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता सुमारास वैरागड-मानापूर मार्गावर वैरागडपासून दीड किमी अंतरावर घडली.
वाहनचालक बबलू राऊत (२०) व वाहक आनंद यादव हे दोघे जण या अपघातात जखमी झाले आहेत. गोंदिया येथील बंटी सय्यद यांच्या मालकीचा एमएच-३१-सीक्यू-४०६७ हा ट्रक आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाचे पोते ब्रह्मपुरी तालुक्यातील गजानन राईस मिल नवेगाव (मक्ता) येथे घेऊन जात होता. या ट्रकमध्ये धानाचे ६०० पोते भरलेले होते. वैरागड-मानापूर मार्गावर सुधाकर लांजेवार यांच्या शेता शेजारी वळणावर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक अपघातग्रस्त झाला. यात चालक बबलू राऊत (२०), वाहक आनंद यादव हे दोघेही जखमी झाले. चालकाच्या डोक्याला तर वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती.
गेल्या काही दिवसात वैरागड-कुरखेडा, मानापूर-वैरागड मार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. छत्तीसगड राज्यातून अनेक जड वाहने याच मार्गावरून जात असल्याने अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. (वार्ताहर)