त्रिवेणी संगमावर स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: February 7, 2015 00:51 IST2015-02-07T00:51:49+5:302015-02-07T00:51:49+5:30
गंगा वाचवा मोहिमेच्या धर्तीवर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील शाळकरी मुले, शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने इंद्रावती- पामुलगौतमी- पर्लकोटा...

त्रिवेणी संगमावर स्वच्छता मोहीम
भामरागड : गंगा वाचवा मोहिमेच्या धर्तीवर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील शाळकरी मुले, शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने इंद्रावती- पामुलगौतमी- पर्लकोटा नद्यांचा त्रिवेणी संगम स्वच्छता मोहिमेचा प्रकल्प हाती घेतला आहे. भामरागड येथे देश- विदेशातून हजारो पर्यटक येतात. मात्र त्रिवणी संगमावर दारू पार्ट्यामुळे हा परिसर प्रदूषित झाला आहे. लोकबिरादरीच्या विद्यार्थ्यांनीच ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
समाजसेवक बाबा आमटे यांचे पुत्र डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी ४५ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट अरण्य असलेल्या भामरागडसारख्या अतिशय दुर्गम भागात लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना करून स्थानिक आदिवासींना आरोग्य व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
आज येथील आदिवासींना अत्याधुनिक उपचार मिळतो तसेच इंग्रजी व मराठी माध्यमातून शिक्षणसुद्धा मिळते. याच शिक्षणाच्या बळावर आज अनेक आदिवासींची मुले डॉक्टर, अभियंता, प्राध्यापक तसेच समाजातील विविध क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. इंद्रावती- पामुलगौतम- पर्लकोटा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या निसर्गरम्य भामरागड येथे देशी- विदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लगतच्या आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून असंख्य पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात. मात्र, पर्यटकांनी भामरागड येथील निसर्गरम्य परिसर मटण, दारू पार्ट्यामुळे अस्वच्छ व प्रदूषित करून ठेवला आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
भामरागड येथील सुंदर त्रिवेणी संगमावर येणाऱ्या काही पर्यटकांनी प्लास्टिक, दारूच्या बॉटला व इतर कचऱ्याने अतिशय घाण केली आहे. जिल्हा प्रशासनाची अतिशय निराशावादी भूमिका असल्याने दारूबंदी असलेल्या या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते. बाहेरील पर्यटकसुद्धा सर्रास परदेशी दारू आणून या परिसरात धिंगाणा करायला लागले आहेत. त्यामुळे इंद्रावती ही नदी प्रदूषित होत आहे. तसेच पामुलगौतम व पर्लकोटा या नद्यांही अस्वच्छ होण्याची भीती आहे. भविष्यात इंद्रावती- पामुलगौतम- पर्लकोटा नद्यांचा त्रिवेणी संगम अस्वच्छ व प्रदूषित होऊ नये म्हणून लोकबिरादरी प्रकल्पातील शाळकरी विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक गावकऱ्यांनी त्रिवणी संगम स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
गंगा वाचवाच्या धर्तीवर ही त्रिवेणी संगम बचाव मोहीम असून यात भामरागड व परिसरातील प्रत्येक नागरिक सहभागी झालेला आहे. या मोहिमेत नदी काठावरील संपुर्ण कचरा गोळा करून तिथेच जाळण्यात आला. तसेच आठवड्यातून एक दिवस विद्यार्थी श्रमदान करून ही मोहीम राबवितात व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडतात.
दरम्यान या मोहिमेकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा पोलीस दलाने या मोहिमेत सहकार्य करताना किमान देशी- विदेशी दारू या परिसरात येऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे, तेव्हाच हा परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त राहणार आहे. यासाठी भामरागडवासीयही दक्ष झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)