सहल हे हसत-खेळत शिक्षण
By Admin | Updated: December 6, 2014 01:34 IST2014-12-06T01:34:46+5:302014-12-06T01:34:46+5:30
शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली महाराष्ट्र दर्शन सहल म्हणजे हसत-खेळत शिक्षणाचा प्रकार आहे.

सहल हे हसत-खेळत शिक्षण
गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली महाराष्ट्र दर्शन सहल म्हणजे हसत-खेळत शिक्षणाचा प्रकार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन शैक्षणिक प्रगती करून स्वत:चा व जिल्ह्याचा विकास करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी आज शुक्रवारला येथे केले.
गडचिरोली जिल्हा पोलीस व महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेंतर्गत जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सहलीची सातवी फेरी आज महाराष्ट्र दर्शनासाठी रवाना झाली. त्याप्रसंगी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील होते. मंचावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, राहुल श्रीरामे (अहेरी), राजकुमार शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
नवनवीन गोष्टी पाहिल्यानंतर मानवी मनाच्या विचाराची प्रक्रिया सुरू होऊन नवीन गोष्टीत आवड निर्माण होत असल्याचे सांगून मेहता म्हणाल्या की, प्रगतीच्या दिशेने मानवाचे पाऊल पडण्याची ही प्रक्रिया असते. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा उर्वरित महाराष्ट्राशी संपर्क होऊन तेथील प्रगतीचा त्यांचा अभ्यास होऊन हसत-खेळत शैक्षणिक विकास व्हावा, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याची प्रगती व्हावी, या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीतील संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपली प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, सहलीच्या माध्यमातून महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या झालेली प्रगती पाहण्याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संधी मिळाली आहे. त्यामुळे या सहलीत घालविलेले क्षण आयुष्याला कलाटणी देणारे ठरणार आहेत. मोठे होण्यासाठी स्वप्न बघण्याची गरज असून त्याला पुर्ण करण्यासाठी परिश्रमाचीही जोड आवश्यक आहे. त्यामुळे आयुष्यात कितीही अडचणी असल्या, तरी शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी इतर मान्यवर व विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच संपदा मेहता यांनी हिरवी झेंडी दाखवून सहलीला रवाना केले. संचालन गजानन बोराटे यांनी केले तर आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. बी. ईलमकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)