आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही
By Admin | Updated: December 21, 2014 22:59 IST2014-12-21T22:59:21+5:302014-12-21T22:59:21+5:30
आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. सदर जबाबदारी आपल्याकडे दिली असल्याने खऱ्या आदिवासींमध्ये बोगस आदिवासींचा समावेश होऊ देणार नाही,

आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही
गडचिरोली : आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. सदर जबाबदारी आपल्याकडे दिली असल्याने खऱ्या आदिवासींमध्ये बोगस आदिवासींचा समावेश होऊ देणार नाही, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळाला भेटीदरम्यान दिले.
नागपूर येथील आदिवासी विकास मंत्र्यांच्या दालनात जिल्ह्यातील आविसंच्या शिष्टमंडळाने भेट देऊन जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांचे गाऱ्हाणे त्यांच्यापुढे मांडले. दिलेल्या निवेदनात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य, कुपोषण, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, वीज आदी प्रश्न सोडविण्याच्या मागण्यांचा समावेश होता. तळागाळातील खऱ्या आदिवासींपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याची मागणी करण्यात आली. खऱ्या आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही, समाजाला संघटीत करण्याची जबाबदारी स्वीकारलेल्यांना सहकार्य करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले.
शिष्टमंडळात आ. संजय पुराम, आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, ज्येष्ठ नेते मोहन पुराम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)