आदिवासी मजुरांचा तेलंगणात छळ

By Admin | Updated: May 1, 2016 01:21 IST2016-05-01T01:21:17+5:302016-05-01T01:21:17+5:30

तालुक्यातील मरकल येथील १३ मजुरांचा तेलंगणा राज्यात छळ केला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष...

Tribal laborers torture in Telangana | आदिवासी मजुरांचा तेलंगणात छळ

आदिवासी मजुरांचा तेलंगणात छळ

एसपींकडे तक्रार : मरकल गावातील नागरिकांचा समावेश
एटापल्ली : तालुक्यातील मरकल येथील १३ मजुरांचा तेलंगणा राज्यात छळ केला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डी. पी. दहागावकर व पीडितांच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, बुर्गीजवळ असलेल्या मरकल येथील कमली दोडगे पुंगाटी, पायल दोडगे पुंगाटी, राजेश कोलू पुंगाटी, मिल्लो पांडू गावडे, बेबी पेका गावडे, छाया पेका गावडे, कुटके भिकारू पुंगाटी, जोगा मालू गावडे, दीपक लक्ष्मण दुर्गे, रमेश फकीरा कामडे, लुला पेका गावडे, रमेश डोलू आत्राम व सूरज रवींद्र कांबळे या १३ जणांना दोन महिन्यांपूर्वी तांबडा येथील लालू लेकामी यांनी जास्त मजुरीचे लालच दाखवून अंगूर, संत्रा, जाम, केळीच्या बगीच्यामध्ये काम करायचे आहे, असे सांगून तेलंगणा राज्यातील भंगारामपेठा येथे दलाल नारायण यांच्याकडे नेले. मात्र त्याठिकाणी बगीचाची कामे न देता त्यांच्याकडून सिमेंट काँक्रिटचे काम करवून घेण्यात येत आहे. दरम्यान त्यांना दासासारखी वागणूक दिली जात आहे. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत आहे. एका बंदीस्थ आवारात सुरा, चाकुंचा धाक दाखवून डांबून ठेवण्यात येत आहे व त्यांच्याकडे काम करवून घेतले जात आहे. यापैकी रमेश डोलू आत्राम, सूरज रवींद्र कांबळे कसेबसे निसटून गावाकडे परत आले.
मरकलटोला येथील देवू वड्डे यांची पत्नी मागील चार वर्षांपासून तेलंगणा राज्यात कामाला गेली असता, बेपत्ता झाली आहे. रेकनार येथील बुक्के डुंगा आतलामी ही महिला सुद्धा दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. यामागे आंतरराज्यीय टोळी सक्रीय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्यवये कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी मरकलचे पोलीस पाटील वंदू गावडे, रमेश गावडे, किरंगी हिचामी, बिरजू पुंगाटी, लिमी गावडे, जयतुला दुर्गे, भीमा पुंगाटी, नीलेश दुर्गे, पेका गावडे, सूरज कांबळे, गजानन डोंगर याच्यासह गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tribal laborers torture in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.