आदिवासी बांधवांनी संघटित होण्याची गरज
By Admin | Updated: October 25, 2015 01:12 IST2015-10-25T01:12:55+5:302015-10-25T01:12:55+5:30
घोटच्या ऐतिहासिक स्थळावर स्मारक बनविणे व अनुसंधान केंद्र बनविणे ही एक भाग्याची गोष्ट आहे.

आदिवासी बांधवांनी संघटित होण्याची गरज
घोट येथे जनजागरण मेळावा : अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन
घोट : घोटच्या ऐतिहासिक स्थळावर स्मारक बनविणे व अनुसंधान केंद्र बनविणे ही एक भाग्याची गोष्ट आहे. अनुसंधान केंद्र जनजागृतीचे प्रभावी साधन ठरू शकते. यातून आदिवासी समाजबांधव एकत्र येतील. नव्हे त्यांना एकत्र येण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. घोट येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना, घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार, प्रकाश गेडाम, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, चामोर्शी पं.स.च्या उपसभापती मंदा दुधबावरे, प्रमोद पिपरे, प्रा. डी. के. मेश्राम, रवींद्र ओल्लालवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री आत्राम म्हणाले, आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासी समाज बांधवांनी संघटीत होणे काळाची गरज आहे. याकरिता आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरावी. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची गडचिरोली ही एक पावनभूमी आहे. आदिवासी समाजाचे आपणा सर्वांना रक्षण करावयाचे आहे. घोट तालुका निर्मितीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विद्यमान राज्य सरकार सदर प्रश्न मार्गी लावेल. या परिसरातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील आम्ही भाजपचे लोकप्रतिनिधी जोरकस प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिली.
खासदार अशोक नेते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने व त्यांच्या लोकप्रतिनिधींनी गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष केले. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक यापूर्वीच व्हायला पाहिजे होते. मात्र तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे ते होऊ शकले नाही. विद्यमान राज्य सरकारच्या काळात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी घोट परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाश गेडाम लिखीत वीर बाबुराव पुलसुरबापू शेडमाके या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पोरेड्डीवार, संचालन रमेश भुरसे यांनी केले तर आभार धर्मराज ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला विलास गण्यारपवार, परशुराम दुधबावरे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)