पावसाळ्यानंतर वृक्ष लागवड

By Admin | Updated: September 8, 2015 03:41 IST2015-09-08T03:41:34+5:302015-09-08T03:41:34+5:30

शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात ३४ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट

Tree planting after rainy season | पावसाळ्यानंतर वृक्ष लागवड

पावसाळ्यानंतर वृक्ष लागवड

गडचिरोली : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात ३४ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अर्धा पावसाळा संपल्यानंतर उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण कसे करावे, असा प्रश्न विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे.
जंगलाचे प्रमाण कमी होत चालले असल्याने पर्यावरण असंतुलित होण्याचा धोका मागील काही दिवसांपासून वाढला आहे. वृक्ष लागवड करून ती जगविणे हाच एकमेव पर्याय असल्याचे लक्षात आल्यानंतर आघाडी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत संपूर्ण राज्यात १०० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जात होते. आघाडी शासनाच्या कालावधीत हे उद्दिष्ट पर्यावरण दिनाच्या पूर्वीच दिले जात होते. मात्र सध्या सत्तेत असलेल्या भाजपा शासनाने सदर योजना सुरू ठेवावी की बंद करावी या पेचात सापडली होती. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी यावर कोणताही निर्णय झाला नाही. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मा पाऊस पडला. जलसाठ्यांमध्ये १० ते १५ टक्के पाणी शिल्लक आहे. सदर जलसाठा डिसेंबर महिन्याच्या अंती संपुष्टात येणार आहे. मानवासाठी पाणी मिळणार नाही. त्यातच वृक्षांसाठी पाणी कुठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्ष लागवडीचा आढावा दरवर्षी घेतला जातो. त्यामुळे वृक्षांची लागवड न झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. उशीरा उद्दिष्ट प्राप्त झाल्याने प्रशासनसुध्दा पेचात सापडले आहे. (नगर प्रतिनिधी)

कोरड्या दुष्काळाने अडचण वाढली
जिल्ह्यात यावर्षी ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्याला शतकोटी वृक्ष लागवड योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले. जेव्हापासून उद्दिष्ट मिळाले, तेव्हापासून जिल्ह्यात थेंबभरही पाऊस पडला नाही. दिवसभर कडाक्याची ऊन पडत असल्याने रोवलेले धान पीक कसे जगवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. संपूर्ण जिल्हाभरात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वृक्ष लागवड करणार कोण व ते जगवायचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.

केवळ एक लाख रोपट्यांची निर्मिती
४रोपट्यांची निर्मिती करण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यात सोनापूर, वाकडी, कृष्णनगर, रामगड, कसनसूर या पाच ठिकाणच्या शासकीय रोपवाटीकांमध्ये केले जाते. या पाचही रोपवाटीकांनी यावर्षी केवळ १ लाख ३ हजार १०७ वृक्ष निर्माण केल्या आहेत. यातील बहुतांश वृक्ष १५ आॅगस्ट रोजी शाळांनी लावली आहेत. काही वृक्ष नागरिक स्वत: खरेदी करून लावतात. त्यामुळे शासकीय रोपवाटीकांमध्येही रोपटे मिळणे कठीण होणार आहे.

आॅक्टोबरमध्ये २१ टक्केच वृक्ष जिवंत
४याच योजनेंतर्गत २०१२-१३ मध्ये १२ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या वृक्षांची आॅक्टोबर २०१४-१५ मध्ये पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान केवळ २ लाख ६५ हजार वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले. एका वर्षाच्या कालावधीत सुमारे १० लाख झाडे मरण पावली. त्यानंतरही किती झाडे जगली, हा प्रश्नच आहे.

Web Title: Tree planting after rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.