रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला
By Admin | Updated: December 4, 2015 01:45 IST2015-12-04T01:45:34+5:302015-12-04T01:45:34+5:30
येथील सिरोंचा पूल नाल्यावरून रेती भरून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वन विभागाच्या पथकाने गुरूवारी सकाळी १० वाजता कारवाई केली आहे.

रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला
आलापल्लीतील घटना : वन विभागाची कारवाई
आलापल्ली : येथील सिरोंचा पूल नाल्यावरून रेती भरून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वन विभागाच्या पथकाने गुरूवारी सकाळी १० वाजता कारवाई केली आहे.
अहेरी वन परिक्षेत्राचे कर्मचारी गस्ती असताना एमएच ३३ एच ९५५९ क्रमांकाचे ट्रॅक्टर सिरोंचा पूल येथून रेती भरून आलापल्लीकडे रेतीची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सदर ट्रॅक्टर आलापल्ली येथील सावरकर चौकात थांबवून पाहणी केली असता, ट्रॅक्टरमध्ये रेती भरली असल्याचे दिसून आले. रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, ट्रॅक्टर चालकाकडे रेती परवाना नसल्याचे आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहन जप्त करून वन परिक्षेत्र कार्यालयात जमा केले. घटनेची माहिती उपविभागीय वनाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी आर. एम. अग्रवाल यांना दिली. वन परिक्षेत्राधिकारी पी. एस. आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी उपक्षेत्राचे वनक्षेत्र सहायक चंद्रशेखर तोंबर्लावार या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. सदर कारवाई अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. एस. आत्राम, अहेरी क्षेत्र सहायक चंद्रशेखर तोंबर्लावार, एस. एस. गुरनुले, आर. एस. मडावी, पी. आर. आनकरी, एस. वाय. रामटेके, पी. एम. नंदगिरवार यांनी केली. या कारवाईमुळे रेती तस्करांची धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)