साडेचार हजार सावित्रींच्या लेकींचा बसमधून प्रवास
By Admin | Updated: August 21, 2016 03:38 IST2016-08-21T03:38:29+5:302016-08-21T03:38:29+5:30
मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून

साडेचार हजार सावित्रींच्या लेकींचा बसमधून प्रवास
मानव विकासची योजना : शाळा नसलेल्या गावातील विद्यार्थिनींना सुविधा
गडचिरोली : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून स्वगावापासून शाळेपर्यंत मोफत प्रवास देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सन २०१६-१७ या चालू शैक्षणिक सत्रात जिल्ह्याच्या ११ तालुक्यातील तब्बल ४ हजार ५७२ विद्यार्थिनींचा मोफत प्रवास सुरू असून त्यांना शिक्षणाचे धडे गिरविणे सुलभ झाले आहे.
मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या ११ तालुक्यांचा समावेश मानव विकास कार्यक्रमांच्या योजनांमध्ये करण्यात आला आहे. मानव विकास मिशनच्या योजनेतून देसाईगंज तालुक्याला वगळण्यात आले आहे. मानव विकास मिशन अंतर्गत शाळकरी विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास व मोफत सायकल वाटप करण्याची योजना आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ज्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा नाही. अशा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नसलेल्या गावांमधील विद्यार्थिनींना बाहेरगावी शिक्षण घेणे सुलभ व्हावे, या उद्देशाने मोफत बस वाहतुकीची सुविधा या योजनेतून देण्यात येत आहे. मानव विकास मिशनच्या ७७ बसफेऱ्या ५०७ गावांच्या परिसरातील मार्गावर सुरू असून २४९ शाळांमधील ४ हजार ५७२ विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत ने-आण करीत आहेत. या सुविधेमुळे सर्वसामान्य विद्यार्थिनींना शिक्षण घेणे सुलभ झाले आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)