वाहतूक दिव्यांची दुरूस्ती रखडली
By Admin | Updated: December 20, 2014 22:39 IST2014-12-20T22:39:04+5:302014-12-20T22:39:04+5:30
शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करण्यावरून नगर परिषद व वाहतूक शाखेमध्ये वाद सुरू झाल्याने शहरातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती रखडली आहे.

वाहतूक दिव्यांची दुरूस्ती रखडली
गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करण्यावरून नगर परिषद व वाहतूक शाखेमध्ये वाद सुरू झाल्याने शहरातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती रखडली आहे.
इंदिरा गांधी चौकात चामोर्शी, आरमोरी, धानोरा व मूल येथून येणारे चारही मुख्य मार्ग मिळतात. त्याचबरोबर शहरातील हे एकमेव मुख्य चौक असल्याने या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्याचबरोबर तेलंगणा व छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या ट्रेलरही याच चौकातून जातात. मात्र या ठिकाणी वाहतूक दिवे नसल्याने वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांचे प्रमाणही वाढले होते. ही बाब लक्षात घेऊन बिल्ट प्रशासनाने सुमारे ४ लाख रूपये खर्चून २००९ साली इंदिरा गांधी चौकात वाहतूक दिवे बसवून दिले. सदर वाहतूक दिवे गडचिरोली शहर वाहतूक शाखेला हस्तांतरीत केले. तीन वर्ष वाहतूक दिवे व्यवस्थित चालल्यानंतर वाहतूक दिव्यांच्या केबलमध्ये बिघाड निर्माण झाला. वाहतूक दिवे दुरूस्तीसाठी जवळपास दीड लाख रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. मात्र एवढा मोठा निधी वाहतूक शाखेकडे उपलब्ध नसल्याने नगर परिषदेने या वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. मात्र वाहतूक दिवे आपल्याकडे हस्तांतरीत झाले नाही. त्याचबरोबर बंदस्थितीतील असलेल्या वाहतूक दिव्यांची मालकी स्वीकारण्यास नगर परिषदेने नकार दिला. वाहतूक शाखेकडून दंडाच्या रूपात गोळा होणाऱ्या शुल्कातून काही शुल्क नगर परिषदेकडे जमा केल्या जाते. या निधीतून तरी वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहतूक शाखेने केली. मात्र नगर परिषदेने वाहतूक दिवे दुरूस्त करण्यास नकार दिला. नगर परिषद व वाहतूक शाखा यांच्यातील वाद जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. वाहतूक दिव्यांची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक दिव्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नगर परिषदेने आता अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली असून वाहतूक दिवे दुरूस्तीसाठी जवळपास १ लाख ३० हजार रूपये खर्च येईल, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली. वाहतूक दिवे लवकर दुरूस्त व्हावेत यासाठी वाहतूक दिवे दुरूस्तीची निविदा मागितली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक दिवे दुरूस्ती होण्यासाठी जवळपास २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.