पोलीस बंदोबस्तात लोहखनिजाची वाहतूक
By Admin | Updated: March 3, 2017 01:04 IST2017-03-03T01:04:30+5:302017-03-03T01:04:30+5:30
नक्षलवाद्यांनी सुरजागड पहाडीवर वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या भागात पुन्हा परत लोहखनिज उत्खनन वाहतूक कामाला सुरूवात झाली आहे.

पोलीस बंदोबस्तात लोहखनिजाची वाहतूक
परप्रांतीय गाड्या वाढल्या : शासनाच्या भूमिकेची नागरिकांना प्रतीक्षा
एटापल्ली : नक्षलवाद्यांनी सुरजागड पहाडीवर वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या भागात पुन्हा परत लोहखनिज उत्खनन वाहतूक कामाला सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारकडून या जाळपोळीच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली होती व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोहदगड वाहतुकीचे काम बंद पडणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानंतर आता २८ फेब्रुवारीपासून पुन्हा कामाला सुरूवात झाली आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केंद्रीय राखीव सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचाही मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील ट्रक लोहखनिज वाहतुकीसाठी लावण्यात आले आहेत. सुरजागड प्रकल्प तालुक्यातच उभारा व प्रकल्प नकोच, असे दोन मतप्रवाह तालुक्यातील नागरिकांमध्ये आहेत. यासाठी अनेक आंदोलनही झालीत. परंतु त्यानंतरही लोहखनिजाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तालुक्यात पहिले प्रकल्प उभारा व विकास कामे सुरू करा, बेरोजगारांना काम द्या, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने या तालुक्यातून लोहखनिजाची वाहतूक सुरू केली असली तरी हा प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे, याविषयी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. प्रकल्प तालुक्यातच व्हावा, अशी मागणी असून याकडे शासन कशा पध्दतीने पाहते, याकडे आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)