बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:38+5:302021-09-05T04:41:38+5:30
गडचिराेली : आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त कार्यालय नागपूरअंतर्गत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर भामरागड प्रकल्प अधिकाऱ्यांनी १३ सप्टेंबरला कार्यमुक्त ...

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणार
गडचिराेली : आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त कार्यालय नागपूरअंतर्गत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर भामरागड प्रकल्प अधिकाऱ्यांनी १३ सप्टेंबरला कार्यमुक्त करण्याचे लेखी आदेश सर्व संबंधित मुख्याध्यापकांना दिले. त्यामुळे आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने शिक्षकदिनी ५ सप्टेंबरपासून हाेणारे उपाेषण मागे घेतले आहे.
आदिवासी विकास विभाग नागपूर कार्यालयस्तरावरून सन २०२१ मध्ये शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने केल्या. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना २० ऑगस्ट २०२१ पर्यंत कार्यमुक्त करण्याचे निर्देश अपर आयुक्तांनी दिले. मात्र सदर आदेशाची काही प्रकल्प कार्यालयाकडून पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे. सहायक जिल्हाधिकारी तथा भामरागडचे प्रकल्प अधिकारी यांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश काढून कार्यमुक्त केल्यास संबंधित मुख्याध्यापकावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश १९ ऑगस्टला काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी हाेती. यासंदर्भात लाेकमतने २४ ऑगस्टला वृत्त प्रकाशित केले. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न केल्याने आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या नागपूर विभागीय शाखेने अपर आयुक्त नागपूर कार्यालयासमाेर ५ सप्टेंबरपासून उपाेषण करण्याबाबत पत्र दिले हाेते. परंतु आता मागण्या मान्य झाल्याने उपाेषण मागे घेण्यात आले आहे.
बाॅक्स
दुर्गम कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची आशा
अपर आयुक्तस्तरावरून गडचिराेली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, देवरी, भंडारा, वर्धा व नागपूर या नऊ प्रकल्पातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी समुपदेशनाने केल्याने कर्मचारी खूश आहेत. यामुळे भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात गेली अनेक वर्षांपासून सेवा करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. परंतु कार्यमुक्त न केल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंताेष निर्माण झाला हाेता. संघटनेच्या शिष्टमंडळाने ३० ऑगस्ट राेजी आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपायुक्त दशरथ कुळमेथे यांची भेट घेेऊन बेमुदत उपाेषणाचे निवेदन दिले. यावेळी कुळमेथे यांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपूर्वी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन संघटनेला दिले हाेते.
बाॅक्स
या आहेत प्रमुख मागण्या
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याबाबत मागणीसह गडचिराेली प्रकल्पांतर्गत शासकीय कर्तव्यावर असताना काेराेनाबाधित झालेल्या कर्मचाऱ्यांचा काेराेना उपचार व विलगीकरण कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, तसेच भामरागड प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.एम. मडावी यांची कायमस्वरूपी थांबविण्यात आलेली वेतनवाढ पूर्ववत लावण्यात यावी, या मागणीसाठी संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास खवशी संबंधित कर्मचाऱ्यांसह उपाेषणाला बसणार हाेते. आता मागण्या मान्य झाल्याचे आश्वासन मिळाल्याने रामदास खवशी व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.