१९१ बटालियनचे एटापल्ली तालुक्यात स्थानांतरण
By Admin | Updated: June 11, 2016 01:24 IST2016-06-11T01:24:40+5:302016-06-11T01:24:40+5:30
पुराडा, मालेवाडा, बेडगाव, कोरची, कोटगुल आदी ठिकाणी १९१ बटालियनच्या तुकड्या कार्यरत होत्या.

१९१ बटालियनचे एटापल्ली तालुक्यात स्थानांतरण
नवीन बटालियन तत्काळ पाठवा : कुरखेडा, कोरची तालुक्यात नक्षल्यांना रान मोकळे
दयाराम फटिंग देसाईगंज
पुराडा, मालेवाडा, बेडगाव, कोरची, कोटगुल आदी ठिकाणी १९१ बटालियनच्या तुकड्या कार्यरत होत्या. मात्र या तुकड्यांचे एटापल्ली तालुक्यात स्थानांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे कुरखेडा, कोरची तालुक्यात नक्षल्यांचा प्रस्थ आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी देसाईगंज, गडचिरोली, धानोरा, अहेरी, एटापल्ली आदी तालुक्यांमध्ये सीआरपीएफच्या बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. कुरखेडा, कोरची तालुक्याची जबाबदारी १९१ क्रमांकाच्या बटालियनवर सोपविण्यात आली होती. या बटालियनचे मुख्य कार्यालय देसाईगंज येथे होते व तुकड्या मात्र पुराडा, मालेवाडा, कोरची, कोटगुल या ठिकाणी कार्यरत होत्या. जंगलात नक्षल विरोधी अभियान राबविण्याचे काम या तुकड्यांच्या वतीने करण्यात येत होते. त्याचबरोबर विविध समाजोपयागी कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले जात होते. त्याचबरोबर शासकीय योजनांची माहिती सुध्दा सीआरपीएफच्या वतीने सिव्हिक अॅक्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येत होती. मात्र या बटालियनचे एटापल्ली तालुक्यात नुकतेच स्थानांतरण करण्यात आले आहे व कसनसूर, हालेवारा, कोटमी, हेडरी, गट्टा या ठिकाणी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एटापल्ली, भामरागड तालुक्यात जरी नक्षलविरोधी अभियान तीव्र होणार असला तरी कुरखेडा, कोरची तालुक्यातील अभियान मात्र थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या कटकारस्थानांना आणखी वाव मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवीन बटालियन येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ती तत्काळ पाठविण्याची मागणी आहे.
दोन बटालियन येणार
१९१ बटालियनच्या जागेवर सीआरपीएफच्या नवीन दोन बटालियन येणार असल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्यासाठी नवीन परिसर राहणार असल्याने या भूभागाची माहिती काढण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो पर्यंत पोलीस विभागावरच नक्षल विरोधी अभियान अवलंबून राहणार आहे.