औषधी वनस्पती लागवडीचे प्रशिक्षण
By Admin | Updated: September 21, 2016 02:35 IST2016-09-21T02:35:04+5:302016-09-21T02:35:04+5:30
स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हाभरातील ३५ शेतकऱ्यांना औषधी व सुगंधित वनस्पती लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.

औषधी वनस्पती लागवडीचे प्रशिक्षण
३५ शेतकऱ्यांचा सहभाग : स्टार स्वयंरोजगार संस्थेचा उपक्रम
गडचिरोली : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हाभरातील ३५ शेतकऱ्यांना औषधी व सुगंधित वनस्पती लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.
वनस्पतींपासून बनलेल्या औषधीकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे जगभरातील शेकडो कंपन्या वनस्पतींच्या माध्यमातून औषधांची निर्मिती करीत आहेत. गडचिरोलीच्या जंगलात अनेक औषधी वनस्पती आहेत. याचाच अर्थ येथील वातावरण, जमीन औषधी वनस्पतीला योग्य आहे. पारंपरिक शेतीऐवजी औषधी किंवा सुगंधित वनस्पतींची शेती केल्यास त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन बँक आॅफ इंडियाद्वारा प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हाभरातील ३५ शेतकऱ्यांना औषधी वनस्पती व सुगंधित वनस्पतींच्या लागवडीविषयी प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाप्रसंगी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, प्रशिक्षक मल्लीक आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ. डॉ. देवराव होळी यांनी शासकीय नोकरी मिळणे कठीण होणार असल्याने युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे, तुमच्या आवडीच्या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी आरसेटी संस्था प्रयत्न करीत आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतींची शेती करण्याचे धाडस एकदा दाखवावे, या शेतीमध्ये शेतकरी यशस्वी झाल्यास इतरही शेतकरी याकडे वळतील, असे मार्गदर्शन केले.
रोजगार हमी योजनेच्या मजुरांना उद्योगाच्या प्रशिक्षणासाठी शिक्षणाची अट काढण्यात आली आहे. याचा फायदा जिल्हाभरातील चार हजार नागरिकांना होणार आहे. असे मार्गदर्शन प्रशिक्षक मल्लीक यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक पी. डी. काटकर, संचालक टेकाम, मेश्राम, विजय पत्रे, सुनील पुन्नमवार यांनी सहकार्य केले.