इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण
By Admin | Updated: November 29, 2014 01:23 IST2014-11-29T01:23:50+5:302014-11-29T01:23:50+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व शासकीय आश्रम शाळांमध्ये ...

इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व शासकीय आश्रम शाळांमध्ये इयत्ता ९ वी व १० वी ला इंग्रजी शिकविणाऱ्या विषय शिक्षकांचे ब्रिटिश कौन्सिल प्रशिक्षणचे आयोजन १ ते ५ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास इंग्रजी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांनी केली आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान ब्रिटिश कौन्सिल इयत्ता ९ वी व १० वी इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण सन २०१४-१५ चे आयोजन १ ते ५ डिसेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले आहे. सुलभ आयोजनाच्या दृष्टीने व शिक्षकांना सोईचे होईल या करिता अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या तालुक्यातील शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण भगवंतराव हायस्कूल अहेरी येथे होणार आहे. चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील शाळेंच्या शिक्षकांचे प्रशिक्षण यशोदीप अध्यापक विद्यालय चामोर्शी येथे होणार आहे. गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शाळेंच्या शिक्षकांच्या प्रशिक्षण भगवंतराव अध्यापक विद्यालय बोदली, गडचिरोली येथे होणार आहे. आरमोरी व वडसा तालुक्यातील शाळेंच्या शिक्षकांचे प्रशिक्षण किसनराव खोब्रागडे अध्यापक विद्यालय आरमोरी येथे होणार आहे. कुरखेडा व कोरची तालुक्यातील शाळेंच्या शिक्षकांचे प्रशिक्षण श्रीराम विद्यालय कुरखेडा येथे होणार आहे. सदर प्रशिक्षणास जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व शासकीय आश्रम शाळांमध्ये इयत्ता ९ वी व १० वीला इंग्रजी शिकविणाऱ्या विषय शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी केले आहे. सदर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणास उपस्थित राहण्याकरीता तसेच प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शकांनासुध्दा प्रशिक्षणाच्या कार्याकरीता मुख्याध्यापकांनी आदेश द्यावेत, अशी सूचना नरड यांनी केली.