चार हजार रोहयो मजुरांना व्यवसायाचे प्रशिक्षण

By Admin | Updated: August 28, 2016 01:28 IST2016-08-28T01:28:45+5:302016-08-28T01:28:45+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर १०० दिवसांचे काम पूर्ण करणाऱ्या जिल्हाभरातील चार हजार चार मजुरांना

Training of 4 thousand laborers in business | चार हजार रोहयो मजुरांना व्यवसायाचे प्रशिक्षण

चार हजार रोहयो मजुरांना व्यवसायाचे प्रशिक्षण

स्वयंरोजगार मिळणार : आरसेटी संस्थेचा उपक्रम
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर १०० दिवसांचे काम पूर्ण करणाऱ्या जिल्हाभरातील चार हजार चार मजुरांना बँक आॅफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली (आरसेटी) च्या वतीने व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या मजुरांची यादी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या दूर करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वतीने केले जात आहे. या कामावर येणारा बहुतांश मजूर वर्ग अशिक्षीत, अल्पशिक्षीत असून अकुशल आहे. यातील काही मजूर दरवर्षी १०० पेक्षा अधिक दिवस रोजगार हमी योजनेचे काम करीत आहेत. यावरून सदर मजूर काही तरी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येते. या मजुरांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्यास सदर मजूर चांगल्या पध्दतीने व्यवसाय सुध्दा करू शकतील, अशी अपेक्षा केंद्र शासनाची आहे. त्यामुळे अशा मजुरांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील लीड बँकेवर देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात लीड बँकेचे काम बँक आॅफ इंडिया करीत आहे. या संस्थेच्या वतीने १०० दिवसांचे रोहयो काम पूर्ण करणाऱ्या मजुरांची माहिती गोळा करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे चार हजार चार मजुरांनी १०० दिवसांचे रोहयो काम पूर्ण केले आहे. या मजुरांची यादी ग्रामीण विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे. या मजुरांना विविध व्यवसायांबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार हजार चार मजुरांना एकाच वेळी प्रशिक्षण देणे शक्य नसल्याने दरवर्षी काही बॅचेस पाडून सदर प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोहयोचे काम अकुशल आहे. सदर मजुराला प्रशिक्षण दिल्यास तो मजूर स्वत:चा रोजगार सुरू करेल. त्याला रोजगार मिळाल्यानंतर त्याच्याच व्यवसायाच्या माध्यमातून इतर व्यक्तींनाही रोजगार प्राप्त होईल. त्याचबरोबर अकुशल रोहयो मजूर कुशल होण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)

चिंगलीतील मजुरांना प्रशिक्षण मिळाले
१०० दिवसांचे रोहयो काम पूर्ण करण्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत धानोरा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यातील १ हजार २२८ रोहयो मजुरांची नावे प्रशिक्षणासाठी वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आली आहेत. धानोरा तालुक्यातील चिंगली येथील ३१ रोहयो मजुरांना बकरीपालनाचे प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आरसेटीचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. याच पध्दतीने टप्प्याटप्प्याने इतरही रोहयो मजुरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Web Title: Training of 4 thousand laborers in business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.