विदर्भवाद्यांचे सेवाग्राम येथे रेलरोको
By Admin | Updated: March 8, 2017 02:10 IST2017-03-08T02:10:37+5:302017-03-08T02:10:37+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता वर्धा येथील...

विदर्भवाद्यांचे सेवाग्राम येथे रेलरोको
६ एप्रिल रोजी आंदोलन : पत्रकार परिषदेत राम नेवलेंनी दिली माहिती
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता वर्धा येथील सेवाग्राम रेल्वेस्थानकावर रेलरोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात विदर्भवादी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी वेगळा विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सदर आश्वासन पाळत नसल्याचे दिसून येत आहे. विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पुढाकाराने ९ आॅगस्ट २०१६, ५ डिसेंबर २०१६ व ११ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले. मात्र भाजप सरकार आता मुके, बहिरे व आंधळे असल्याने त्यांना या आंदोलनाची दखल घेता आली नाही. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ६ एप्रिल रोजी सेवाग्राम येथे रेलेरोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या थांबविल्या जाणार आहेत, अशी माहिती राम नेवले यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, समय्या पसुला, राजेंद्रसिंह ठाकूर, रमेश भुरसे, शालिक नाकाडे, जगदिश बेंद्रे, प्रतिभा चौधरी, अमिता मडावी, संगीता गडपायले, घिसू खुणे, नामदेव लांडगे, गोपाल रायपुरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
यवतमाळ व मेहकर येथे शेतकरी मेळावे
सतत वाढत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे खरे कारण काय, त्यासाठी जबाबदार कोण याच अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. १९ मार्च रोजी यवतमाळ येथील ज्योती मंगल कार्यालयात तर २४ मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.