पुलाअभावी रहदारीची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:00+5:30
नाल्यावर उंच स्वरूपाचा पूल नसल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे या भागातील वाहतूक दोन ते तीन दिवस ठप्प होत असते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने सदर नाल्यावर उंच पूल बांधला नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पुलाची निर्मिती होणार का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

पुलाअभावी रहदारीची समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरातील देलनवाडीपासून चार किमी अंतरावर असलेल्या पिसेवडधा गावाजवळ खारडी नाला आहे. मात्र या नाल्यावर उंच स्वरूपाचा पूल नसल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे या भागातील वाहतूक दोन ते तीन दिवस ठप्प होत असते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने सदर नाल्यावर उंच पूल बांधला नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पुलाची निर्मिती होणार का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
सहा वर्षांपूर्वी सदर नाल्यावर रपटा बांधण्यात आला. मात्र या रपट्याची उंची अतिशय कमी असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने पावसाळ्यात हा रपटा कुचकामी ठरला आहे. पिसेवडधा येथील नदीवर पूल झाल्यामुळे कोरची, कुरखेडापासूनची सर्व वाहने गडचिरोलीसाठी शॉर्टकट रस्ता म्हणून याच मार्गाने आवागमन करतात. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात हलक्याशाही पावसाने दोन ते तीन दिवस सदर मार्गावरील वाहतूक ठप्प होते.
कुरखेडावरून कसारी मार्गे या भागात फेरा मारून यावे लागते. यात वाहनधारकांचा बराच वेळ वाया जातो. खारडीच्या नाल्यावर पुलाची निर्मिती करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पिसेवडधा ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही. खारडी, पिसेवडधा, मानापूर, दवंडी, भाकरोंडी, खडकी, कुलकुली, मोहझरी आदी परिसरातील लोकांना पावसाळ्यात ठेंगण्या रपट्यामुळे त्रास सहन करावा लागतो. गतवर्षीच्या पावसाळ्यातही मानापूर भागातील वाहतूक पूरपरिस्थितीमुळे अनेकदा विस्कळीत झाली होती. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. परिणामी खारडी नाल्यावर पाणी चढले होते. पाच ते सहा दिवस अधून-मधून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतातरी ठोस नियोजन करून पारडी नाल्यावर उंच पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.