पदयात्रेकरूंचे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: December 17, 2015 01:30 IST2015-12-17T01:30:01+5:302015-12-17T01:30:01+5:30
सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली परिसरातच उभारण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर १७ मागण्यांसाठी ....

पदयात्रेकरूंचे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
अहेरीत पोहोचली : धर्मरावबाबांनी केले यात्रेकरूंचे स्वागत
अहेरी : सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली परिसरातच उभारण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर १७ मागण्यांसाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या वतीने रविवारपासून काढण्यात आलेली सूरजागड-गडचिरोली अशी पदयात्रा बुधवारी अहेरी शहरात पोहोचली. त्यानंतर यात्रेकरूंनी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यात्रेकरूंचे स्वागत करून यात्रेकरूंना संबोधित केले.
सूरजागड-गडचिरोली ही पदयात्रा बुधवारी सायंकाळी ५.४० वाजता अहेरी नगरीत पोहोचली. येथील राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पदयात्रेचे स्वागत केले. तसेच अहेरी उपविभागातील नागरिकांनी सदर पदयात्रेला पूर्णत: समर्थन द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान जनहितवादी युवा समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी सदर पदयात्रेचा उद्देश लोकांना सांगितला.
यावेळी धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, सूरजागड प्रकल्प हा आपला अधिकार असून सदर प्रकल्प अहेरी उपविभागातच झाला पाहिजे, सदर प्रकल्पामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल तसेच या भागातील नागरिकांना सातबारामध्ये भोगवटदार क्र. १ मध्ये स्थान देण्यात यावे, ज्यामुळे येथील रहिवासी नागरिक येथील खरे मालक होऊ शकतात. सूरजागड-गडचिरोली या पदयात्रेला माझा व माझ्या कार्यकर्त्यांचा पूर्णत: पाठिंबा आहे, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. सूरजागड-गडचिरोली ही पदयात्रा सूरजागड, एटापल्ली, आलापल्ली येथून अहेरीला पोहोचली. या यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून अहेरी उपविभागातील समस्यांबाबत जनजागृती केली. (शहर प्रतिनिधी)
आष्टी मार्ग १९ ला गडचिरोलीत पोहोचणार पदयात्रा
अहेरीवरून सदर पदयात्रा लगाम-आष्टी मार्ग १७ डिसेंबरला चामोर्शी येथे पोहोचेल. या ठिकाणी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन त्यानंतर १९ डिसेंबर रोजी खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानासमोर पदयात्रा पोहोचल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. येथून इंदिरा गांधी चौकात ठिय्या आंदोलन झाल्यानंतर सदर पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
सूरजागडवरून सुरू झालेल्या या पदयात्रेला विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी माजी आ. दीपक आत्राम यांनी पदयात्रेला मार्गदर्शन केल्यानंतर बुधवारी अहेरी येथे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनीही यात्रेकरूंना मार्गदर्शन करून आपला पाठिंबा दर्शविला. या यात्रेत हजारोंच्या संख्येत आदिवासी सहभागी झाले आहेत.