वाहतूक दिवे पुन्हा सुरू होणार
By Admin | Updated: March 5, 2017 01:22 IST2017-03-05T01:22:05+5:302017-03-05T01:22:05+5:30
मागील तीन वर्षांपासून बंद असलेले शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिवे दुरूस्त झाले असून

वाहतूक दिवे पुन्हा सुरू होणार
दिव्यांची दुरूस्ती पूर्ण: मागील तीन वर्षांपासून होते बंद
गडचिरोली : मागील तीन वर्षांपासून बंद असलेले शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिवे दुरूस्त झाले असून या दिव्यांची शनिवारी ११.३० वाजता चाचणी घेण्यात आली असता दिवे सुरू झाले; मात्र या दिव्यांमध्ये टाईम सेटिंग नसल्याने सदर टाईम सेटिंग करून वाहतूक दिवे सोमवारी पूर्ववत सुरू केले जाणार आहेत.
बल्लारपूर पेपरमिलच्या सीएसआर निधीतून इंदिरा गांधी चौकात पाच वर्षांपूर्वी वाहतूक दिवे बसविण्यात आले होते. मात्र त्यानंतर वाहतूक दिवे अगदी दीड ते दोन वर्षातच बंद पडले. तेव्हापासून सदर वाहतूक दिवे जवळपास तीन वर्षांपासून बंदच होते. सदर वाहतूक दिवे दुरूस्त करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात नगरोत्थान योजनेतून २ लाख ४१ हजार ४४० रूपये मंजूर केले. या निधीतून नगर परिषदेने वाहतूक दिव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. मागील एक महिन्यापासून सदर काम केले जात होते. चारही वाहतूक दिव्यांसाठी भूमिगत वायर टाकण्यात आले आहेत. या वायरमध्ये बिघाड निर्माण झाला होता तर काही वायर तुटले होते. चारही बाजुला खड्डे खोदून वायर दुरूस्त करण्यात आले. त्यानंतर सदर वाहतूक दिवे शनिवारी सुरू केले. चारही मार्गावरील वाहतूक दिवे सुरू झाले. मात्र सदर वाहतूक दिव्यांमध्ये टाईम सेटिंगची समस्या निर्माण झाली आहे. केवळ १५ सेकंदाच्या अंतराने वाहतूक दिवे चालूबंद होतात. १५ सेकंद हा अतिशय कमी वेळ आहे. त्यामुळे यामध्ये बदल करून किमान दोन ते तीन मिनिटांचा टाईम सेट करावा लागणार आहे. यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्याला बोलविले जाणार असून सोमवारपासून सदर वाहतूक दिवे पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)