ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 22:09 IST2017-11-04T22:09:03+5:302017-11-04T22:09:16+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा-कोरची मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून ओव्हरलोड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.

ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा/कोरची : गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा-कोरची मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून ओव्हरलोड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. दरम्यान कुरखेडा-कोरची मार्गावर असलेल्या घाटावर ट्रक उलटल्याने शुक्रवारी १२ वाजतापासून तर गुरूवारी सायंकाळी ४.१५ वाजतापर्यंत वाहतूक ठप्प पडली होती. उलटलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध असल्याने तब्बल १५ तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. परिणामी या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरवरून तब्बल ३६ टन लोखंडी सळाख घेऊन ट्रक रायपूरकडे जात होता. दरम्यान ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कोरची घाटावरील वळणावर ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे हा मार्ग बंद पडला. सदर घटना रात्री १२ वाजता घडली असली तरी गुरूवारी दुपारी २.३० वाजता घटनास्थळी क्रेन पोहोचली. या क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ट्रकला बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी ४.१५ वाजतानंतर ट्रक बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर ४.३० वाजतापासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. कुरखेडा-कोरची मार्गावरून नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात आंतरराज्य स्तरावरील जड वाहतूक सुरू आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
ओव्हरलोड वाहतुकीमुळे या रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहे. परिणामी या मार्गावरून प्रवाशांना जीव मुठीत घालून धोकादाय प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर मार्गावरील ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालण्याची मागणी होत आहे.