Traffic jam due to truck collision | ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प
ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प

ठळक मुद्देवाहनांची लागली रांग : कोटापोचमपल्लीजवळ दलदल

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सिरोंचापासून २० किमी अंतरावर असलेल्या कोटापोचमपल्ली गावाजवळ दोन ट्रक मुख्य मार्गावर फसले. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प पडली होती.
मागील एक महिन्यापासून संततधार पाऊस पडत आहे. छत्तीसगड राज्यातून येणारे मोठमोठे ट्रक सिरोंचा मार्गे तेलंगणा राज्यात जातात. कोटापोचमपल्ली गावाजवळ मुख्य मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी एकमेकापासून काही दूर अंतरावर दोन ट्रक फसले. रस्त्यावर ट्रक फसले असल्याने समोरून एखादे वाहन आल्यास सदर वाहन पुढे जातपर्यंत इतर वाहनांना प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती.
दलदलीमुळे डांबर पूर्णपणे निघून माती वर आली. त्यामुळे या ठिकाणी कच्चा रस्ता असावा, असा मार्ग दिसून येत होता. सायंकाळपर्यंत दोन्ही ट्रक रस्त्यावर फसलेच असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. बांधकाम विभागाने या ठिकाणी गिट्टी टाकून या मार्ग दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे. जोराचा पाऊस झाल्यास पुन्हा या ठिकाणी वाहने फसण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Web Title: Traffic jam due to truck collision
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.