बसने वाहतुकीचा खोळंबा
By Admin | Updated: July 27, 2016 01:52 IST2016-07-27T01:52:41+5:302016-07-27T01:52:41+5:30
गडचिरोलीवरून गोंडपिपरीकडे जाणारी बस मंगळवारी सकाळी १० वाजता मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बसने वाहतुकीचा खोळंबा
चालकाने एसटी लावली आडवी : आष्टीच्या आंबेडकर चौकातील प्रकार
आष्टी : गडचिरोलीवरून गोंडपिपरीकडे जाणारी बस मंगळवारी सकाळी १० वाजता मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरच लावली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. सदर चालकाला ताकीद देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आष्टी येथील मुख्य चौकातून अहेरी, सिरोंचा, चंद्रपूर, गोंडपिपरी व आष्टी परिसरातील ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बसेस थांबतात. त्यामुळे या ठिकाणी खासगी वाहने व बसची नेहमीच वर्दळ राहते. गोंडपिपरीकडे जाणाऱ्या बसेस चंद्रपूर मार्गावर रस्त्याच्या बाजुला थांबविणे आवश्यक आहे. मात्र मंगळवारी आष्टी-गोंडपिपरी बसच्या चालकाने बस सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच उभी केली. या ठिकाणी येणाऱ्या बसेस जवळपास पाच ते दहा मिनीटे थांबतात. एवढ्या कालावधीत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. सदर बस रस्त्याच्या बाजुला लावणे आवश्यक असतानाही मधोमध लावले जाते.
मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या मध्यंतरी बस लावण्याचे प्रकार वाढले आहेत. संबंधित चालकांवर पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने हळूहळू चालकांची हिंमत वाढत चालली आहे. ही गंभीर बाब असून याकडे एसटी प्रशासनाने सुद्धा जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे नागरिकांनी म्हटले आहे.
डॉ. आंबेडकर चौकातील चारही मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून दुकाने थाटले आहेत. फेरीवालेही रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटतात. अशातच एसटीसह प्रवाशी वाहने अगदी रस्त्याच्या मधोमध उभी केली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा आणखी वाढला आहे. यामुळेच आष्टी येथे अपघातांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढले आहे. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करणाऱ्या चालकांवर तसेच वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आष्टी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)