ट्रॅक्टरधारकांचे कामबंद आंदोलन
By Admin | Updated: July 27, 2015 03:14 IST2015-07-27T03:14:19+5:302015-07-27T03:14:19+5:30
महाराष्ट्र शासनाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नुकताच एक नवीन निर्णय घेतला आहे.

ट्रॅक्टरधारकांचे कामबंद आंदोलन
एटापल्लीत शासनाच्या जाचक अटींचा निषेध : मालक, चालक व मजुरांमध्ये तीव्र रोष
एटापल्ली : महाराष्ट्र शासनाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नुकताच एक नवीन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ट्रॅक्टरचालकांवर विविध निर्बंध लादून देण्यात आले आहे. शासनाच्या या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात एटापल्ली तालुक्यातील संपूर्ण ट्रॅक्टर मालक, चालक व मजुरांनी रोष व्यक्त केला असून २४ जुलैपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे एटापल्ली गोटूल भवन परिसरात मोकळ्या जागेत ट्रॅक्टर तसेच ट्राल्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी केल्या आहेत. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. परिणामी याच व्यवसायावर ट्रॅक्टर मालक, चालक व मजुरांच्या कुटुंबांचा उदनिर्वाह सुरू आहे. एटापल्ली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विविध शासकीय इमारतीचे तसेच खासगी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या इमारत बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेतीची आवश्यकता भासते. ट्रॅक्टरने रेती पुरविण्याचे काम ट्रॅक्टर मालक, चालक व मजुरांमार्फत सुरू होते. दरम्यान महाराष्ट्र शासनाने नवा शासन निर्णय निर्गमित करून अवैध रेती उत्खनन वाहतुकी संदर्भात ट्रॅक्टरचालकांवर जाचक निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत रेती वाहतुकीचा व्यवसाय करणे, कठीण झाले आहे. त्यामुळे अहेरी व आलापल्ली भागातील संतप्त ट्रॅक्टर मालक व चालकांनी २४ जुलैपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. शासन जोपर्यंत नव्या निर्णयात बदल करून अवैध रेती वाहतुकीबाबतच्या जाचक अटी शिथील करणार नाही, तोपर्यंत व्यवसाय करणार नाही, असा इशारा ट्रॅक्टर चालक व मालकांनी दिला आहे. रेतीची वाहतूक बंद झाल्याने बांधकामावर परिणाम होत आहे. अवैध रेती वाहतुकीच्या कारवाईबाबत राज्य शासनाने ट्रॅक्टरचालकांवर जाचक अटी लादल्या आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ एटापल्ली तालुक्यातील ट्रॅक्टरधारकांनी आपल्या ट्रॅक्टर व ट्राली मोकळ्या जागेत उभ्या करून रेती वाहतुकीचा व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे शासकीय तसेच खासगी बांधकामासाठी रेती मिळणे आता कठीण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी संबंधित ट्रॅक्टरचालकावर दंड आकारण्यात येणार आहे.
तोच ट्रॅक्टरचालक दुसऱ्यांदा रेतीची अवैध वाहतूक करताना आढळल्यास संबंधित ट्रॅक्टरचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तसेच रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सदर ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात येणार आहे.
दोन ते तीनदा रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधित ट्रॅक्टरचालकाला यापुढे आपण रेतीची अवैध वाहतूक करणार नाही, असे शपथपत्र स्वत:च्या स्वाक्षरीनिशी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना लिहून द्यावे लागणार आहे.