तेंदूपत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2015 01:17 IST2015-05-31T01:17:10+5:302015-05-31T01:17:10+5:30
कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला येथून गोंदिया जिल्ह्यातील सौंदळकडे कसारीमार्गे तेंदूपत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली जीवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने ...

तेंदूपत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली जळाली
विद्युत ताराचा स्पर्श : ४ लाख ४० हजारांचा तेंदूपत्ता जळून खाक
कोरेगाव/चोप : कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला येथून गोंदिया जिल्ह्यातील सौंदळकडे कसारीमार्गे तेंदूपत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली जीवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने जळाल्याने ट्रालीतील ४ लाख ४० हजार रूपये किंमतीचा ८० बॅग तेंदूपत्ता जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कसारी-कोरेगाव मार्गावर कसारी नाल्याजवळ घडली.
जिल्ह्यात पाचही वन विभागात तेंदू संकलनाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून बोद भराईच्या कामाला गती आली आहे. कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला येथून एमएच ३३-९९०१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने एमएच ३६-९५४२ क्रमांकाच्या ट्रालीमध्ये ८० बॅग तेंदूपत्ता घेऊन ट्रॅक्टरचालक देवनाथ नक्टू सुकारे हा कोरेगाव-कसारी मार्गे गोंदिया जिल्ह्यातील सौंदळकडे जात होता. कसारी फाट्याजवळ रस्त्यावर आलेल्या जीवंत विद्युत तारांचा तेंदू बॅगला स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरच्या ट्रालीसह तेंदूपत्ता जळून खाक झाला. ट्रालीतील ७२ हजार ३५० तेंदू पुडे भस्मसात झाले. या घटनेमुळे ट्रॅक्टर मालकाचे एक लाख तर तेंदूपत्ता कंत्राटदाराचे ४ लाख ४० हजार रूपये असे एकूण ५ लाख ४० हजारांचे नुकसान झाले.
ट्रॅक्टरचालक देवनाथ सुकारे याच्या सतर्कतेमुळे ट्रॅक्टरची इंजिन आगीपासून बचावले. या घटनेतील ट्रॅक्टर खेडेगाव येथील सुधाकर उसेंडी यांच्या मालकीची आहे. या घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)