आजपासून शेतकरी साहित्य संमेलन

By Admin | Updated: February 25, 2017 01:22 IST2017-02-25T01:22:31+5:302017-02-25T01:22:31+5:30

तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील

Today's Farmers Literature Convention | आजपासून शेतकरी साहित्य संमेलन

आजपासून शेतकरी साहित्य संमेलन

गडचिरोली येथे : पत्रकार परिषदेत माहिती; शेतकऱ्यांच्या समस्यांवर होणार चर्चा
गडचिरोली : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते राहणार असून उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील नाकाडे राहतील. मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे. परंतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह होत नाही. तसेच उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही.
साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर सानप, कृषी अर्थतज्ज्ञ संजय पानसे, नगराध्यक्ष योगीता पिपरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ५.४५ वाजेपर्यंत ‘भारतीय शेतीची पराधिनता’ या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ६ वाजता स्वामीनाथन आयोग आणि मुक्त अर्थव्यवस्था, रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत शेतकरीविरोधी कायद्यांचा परिचय, रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत शेतकरी कवी संमेलन आयोजित केले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता प्रकट मुलाखत, १०.१५ वाजता पारंपरिक कथा, लोकगीते, ग्रामीण स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन, दुपारी ११.४५ वाजता शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेतकरी यशोगाथांचे गौडबंगाल, दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत शेतकरी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता समारोप व पुरस्कारांचे वितरण केले जाईल. समारोपीय कार्यक्रमाला शेतकरी नेते अ‍ॅॅड. वामनराव चटप, अनिल घनवट, राजेंद्रसिंह ठाकूर उपस्थित राहणार आहेत. शेती आणि शेतकरी या विषयावर विश्वस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती गंगाधर मुटे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला अशोक गडकरी, ईश्वर मत्ते, सुरेश शेंडे, गणेश मुटे, विनोद काळे उपस्थित होते.

Web Title: Today's Farmers Literature Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.