समस्यांच्या विळख्यात नागरिकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:13 IST2017-08-30T01:12:52+5:302017-08-30T01:13:37+5:30

शहरातील विविध भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकमत युवा नेक्स्टतर्फे खास वाचकांसाठी ‘एक दिवसाची पत्रकारिता’ ही स्पर्धा घेतली.

Tired of the people in the news of the problem | समस्यांच्या विळख्यात नागरिकांची दमछाक

समस्यांच्या विळख्यात नागरिकांची दमछाक

ठळक मुद्देनागरिकांनी मांडल्या समस्या : नाली उपसण्यातील अनियमितता, अतिक्रमण व दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील विविध भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकमत युवा नेक्स्टतर्फे खास वाचकांसाठी ‘एक दिवसाची पत्रकारिता’ ही स्पर्धा घेतली. त्यात त्यांच्या वॉर्डातील विविध समस्या वाचकांनी छायाचित्रांसह लोकमतकडे पाठविल्या. त्यापैकी प्रथम तीन क्रमांकाच्या बक्षीसपात्र ठरलेल्या बातम्या येथे देत आहोत.
प्रथम क्रमांकाची कारगिल चौकातील समस्येवरील बातमी अ‍ॅड.कविता मोहरकर यांची ठरली. द्वितीय क्रमांकाची ठरलेली बातमी साईनगरातील समस्यांवर अरविंद उरकुडे यांनी पाठविली. तर तृतीय क्रमांक शहरातील हायमास्ट दिव्यांवरील बातमीसाठी नरेंद्र उंदीरवाडे यांना मिळाला.
शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगर परिषदेवर आहे. मात्र शहरातील बहुतांश वॉर्डांमध्ये नालीचा वेळोवेळी उपसा न झाल्याने नाल्या गाळाने तुंबल्या आहेत. काही वॉर्डांमध्ये जाण्यासाठी पक्क रस्ते नसल्याने चिखलातून पाय तुडत जावे लागते. घराच्या सभोवताल डुकरांचा वावर दिवसभर राहतो. नालीतील पाणी रस्त्यावर व मुसळधार पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याचे चित्र बघायला मिळते. कित्येक पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वॉर्डामध्ये रात्रीच्या सुमारास काळोख पसरला राहतो. पावसाळ्यात मुरूम टाकण्याचे आश्वासन नगर पालिकेने दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले. नगरसेवकांनी केवळ मुरूम टाकण्याच्या रस्त्यांची यादी गोळा केली, मात्र प्रत्यक्षात मुरूम पडले नाही. शहरात विविध ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले आहेत. मात्र यातील बहुतांश हायमास्ट बंद स्थितीत आहेत. अतिक्रमण काढण्याची हिंमत नगर पालिकेमध्ये नाही. काही वॉर्डांमध्ये पाण्याची गंगा वाहते. तर काही वॉर्डांमध्ये गुंडभर पाणी मिळणेही कठीण जाते.
साईनगरात प्रवेशापासूनच समस्यांची सुरुवात
बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या साईनगरात जाण्यासाठी एकच मार्ग आहे. सदर मार्ग अरूंद असल्याने एक चारचाकी वाहन गेल्यानंतर दुसरे दुचाकी वाहनही जाण्यास अडथळा निर्माण होतो. कारमेल स्कूलच्या वसतिगृहाकडून जाणारा मार्ग कारमेल स्कूलच्या प्रशासनाने संरक्षण भिंत टाकून बुजविला असल्याने सदर मार्ग आता कायमचा बंद झाला आहे. बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या या एकाच अरूंद मार्गाने ये-जा करावी लागत आहे. या मार्गावर खड्डे पडले आहेत. राज्य महामार्गाला जोडणाºया रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र या ठिकाणी मोठा उतार ठेवल्याने अपघात वाढले आहेत. सदर मार्ग मध्यभागी फुटला आहे. २० वर्षांपूर्वी साईनगरात वस्ती निर्माण झाली. परंतु अजूनही या वॉर्डात नाल्यांचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण आहे. ठिकठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले आहेत. या ठिकाणी डुकारांचा दिवसभर वावर राहतो. कचºयापेट्या नाहीत. त्यामुळे नागरिक रिकामी जागा पाहून कचरा टाकतात. अधेमध्ये घंटागाडी येते, घंटागाडी घेऊन येणारे मजूर जमा झालेला कचरा कारमेल हायस्कूलच्या बाजूला असलेल्या कचरापेटीत जमा करतात. या कचºयाची वेळोवेळी उचल केली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली आहे. वॉर्डातील समस्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले असल्याचा आरोप या वॉर्डातील नागरिक अरविंद शिवराम उरकुडे यांनी केला आहे.
कारगिल चौकात पावसाच्या पाण्याची वाहते गंगा
चंद्रपूर मार्ग व विसापूर मार्गाच्या मध्यभागी त्रिकोणी आकारात वसलेले कारगिल चौक विकासापासून कोसो दूर आहे. उच्चभ्रु लोकांची वस्ती म्हणून ओळख असली तरी येथील समस्यांमुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळ्यात येथील नागरिकांच्या अंगणवातून नदीप्रमाणे पाण्याचा प्रवाह वाहत असल्याचे चित्र बघायला मिळते. त्यातही वासेकर संकुलाच्या सभोवताल घाण व डुकरांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. नाल्यांची साफसफाई होत नाही. पावसाळ्यात नालीतील घाण नागरिकांच्या अंगणात शिरते. वस्तीच्या अगदी समोर नगर परिषदेचे व्यावसायिक गाळे आहे. वस्तीतून निघण्याचा रस्ता या गाळ्यांच्या परिसरातून जातो. दुकानांमध्ये येणारे ग्राहक अगदी रस्त्यावरच दुचाकी किंवा चारचाकी वाहन ठेवतात. त्यामुळे बºयाचवेळा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रविवारी या संपूर्ण परिसरात वाहने ठेवली जातात. त्यामुळे रविवारी दिवसभर वाहन घेऊन घराबाहेर पडणेही कठीण होते. वस्तीतील समस्या अनेकवेळा नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. त्यांची अनेकदा भेट घेतली आहे. मात्र नगर परिषदेचे प्रशासन आश्वासनांशिवाय काहीच देत नसल्याने या वॉर्डातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी कारगिल चौकातील रहिवासी अ‍ॅड. कविता मोेहरकर यांनी केली आहे.
लाखोंचे हायमास्ट बिनकामी
नगर परिषदेने शहरातील इंदिरा गांधी चौक, शासकीय विज्ञान महाविद्यालय, आठवडी बाजार चौक, बसस्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय आदी ठिकाणी हायमास्ट लाईट लावले आहेत. या लाईटांसाठी नगर परिषदेने लाखो रूपयांचा खर्च केला आहे. मात्र नगर परिषदेने या दिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक हायमास्ट लाईट बंद आहेत. गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळील हायमास्ट लाईट वर्षभरापासून तुटून पडला आहे. सदर लाईट अजूनपर्यंत लावला नाही. या मार्गावर अनेक नागरिक पहाटे व रात्री फिरायसाठी जातात. या ठिकाणी अंधार पसरला आहे. बसस्थानकाजवळील हायमास्ट लाईट बरेच दिवस बंद होता. एक महिन्यापूर्वी त्याची दुरूस्ती करण्यात आली. इंदिरा गांधी चौकातील हायमास्टवरील काही लाईट बंद पडले आहेत. हायमास्टची दुरूस्ती करावी, अशी मागणी गोकुलनगरातील नरेंद्र दौलत उंदीरवाडे यांनी केली आहे.
 

Web Title: Tired of the people in the news of the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.