२४ कोटींचे चुकारे थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:40 IST2017-01-17T00:40:54+5:302017-01-17T00:40:54+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत खरीप पणन हंगाम ....

२४ कोटींचे चुकारे थकीत
खरिपातील धान खरेदी : आॅनलाईन वेतन प्रणाली शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
गडचिरोली/धानोरा : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये आधारभूत योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण ८० धान खरेदी केंद्रांवरून ५४ कोटी ९० हजार ४०६ रूपये किमतीच्या ३ लाख ६७ हजार ४०८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र अद्यापही तब्बल ४ हजार ६८९ शेतकऱ्यांचे २४ कोटी ८२ लाख ९१ हजार ३७९ रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या आॅनलाईन वेतन प्रणालीत धान चुकाऱ्याची रक्कम अदा करण्यास प्रचंड दिरंगाई होत आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५८ धान केंद्र मंजूर करण्यात आले असून सुरू झालेल्या ५३ केंद्रावर धानाची आवक झाली आहे. १३ जानेवारी २०१७ पर्यंत ५३ केंद्रांवर ३८ कोटी ६९ लाख ४२ हजार ११७ रूपये किमतीच्या २ लाख ६३ हजार २२५ क्विंटल इतकी धान खरेदी झाली. यापैकी ६ हजार ८०२ शेतकऱ्यांना २४ कोटी १३ लाख ८७ हजार ४०६ रूपयाचे धान चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही २ हजार ७८९ शेतकऱ्यांना धान चुकाऱ्यांपोटी १४ कोटी ५५ लाख ५४ हजार ७१० रूपये अदा करणे शिल्लक आहे.
अहेरी कार्यालयांतर्गत एकूण ३१ केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी ३० केंद्र सुरू झाले असून २७ केंद्रावर धानाची आवक झाली आहे. सदर २७ केंद्रावर आतापर्यंत १५ कोटी ३१ लाख ४८ हजार २८९ रूपये किमतीच्या १ लाख ४ हजार १८२ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धान खरेदीपोटी ९११ शेतकऱ्यांना ५ कोटी ४ लाख ११ हजार ६२१ रूपये धान चुकारे म्हणून अदा करण्यात आले आहे. अद्यापही तब्बल १ हजार ९०० शेतकऱ्यांचे १० कोटी २७ लाख ३६ हजार ६६८ रूपयाचे चुकारे देणे शिल्लक आहे. गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून जिल्ह्यातील एकूण ४ हजार ६८९ शेतकऱ्यांचे तब्बल २४ कोटी ८२ लाख ९१ हजार ३७९ रूपयाचे धान चुकारे प्रलंबित आहेत. धान चुकाऱ्याची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळते केली जात आहे. मात्र राज्य शासनाकडून धान चुकाऱ्यासाठीचा निधी देण्यास विलंब होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (स्थानिक/तालुका प्रतिनिधी)
१० महिने उलटूनही रक्कम मिळेना
धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सावरगाव येथील शेतकरी रामनाथ बुधराम काटींगल यांनी १६३ क्विंटल धान २५ मार्च २०१६ रोजी सहकारी संस्थेच्या सावरगाव येथील केंद्रावर नेऊन विक्री केली. अद्यापही ८६ हजार ८२७ रूपयांचे बिल प्रलंबित आहे. शेतकरी काटींगल यांनी धानोराच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट झाली नाही. सदर शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्याची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन उपव्यवस्थापक कुंभार यांनी लोकमतशी बोलताना दिले.१० महिने उलटूनही रक्कम प्रलंबित आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज
सावरगाव केंद्रावरून लाखो रूपयांचे धान चोरी गेल्याचे प्रकरण जून २०१६ मध्ये उघडकीस आले. या प्रकरणाचाही परिणाम धान चुकारे अदा करण्यावर होत आहे. शेतकऱ्याने विक्री केलेल्या धानाची अफरातफर झाली. यात शेतकऱ्यांचा काय दोष, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. उन्हाळ्यात या केंद्रावरून धानाची उचल केली असती तर हे प्रकरण घडले नसते. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन शेतकऱ्यांना धान चुकारे मिळण्यासाठी प्रयत्न करावे.
आपण धानोरा तालुक्याच्या सावरगाव येथील आदिवासी सेवा संस्थेच्या केंद्रावर १ हजार ३६० रूपये प्रती क्विंटल दराने २५ मार्च २०१५ रोजी १६३ क्विंटल धानाची विक्री केली. मात्र या धान खरेदीचे ८८ हजार ८७२ रूपयांचे चुकारे अद्यापही मिळालेली नाही. धान विक्रीच्या बिलाची रक्कम मला न मिळाल्याने प्रचंड आर्थिक अडचण जाणवत आहे. धानाची विक्री करूनही पैसा हाती न आल्याने पुढील आर्थिक कामे कशी करावीत, या विवंचनेत मी सापडलो आहे.
- रामनाथ बुधराम काटीगल, शेतकरी सावरगाव ता. धानोरा