टिप्पागड व चपराळा अभयारण्य रखडले

By Admin | Updated: May 5, 2016 00:16 IST2016-05-05T00:16:11+5:302016-05-05T00:16:11+5:30

महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू किंवा देवखार (जायंट स्क्विरल) सह असंख्य दुर्मिळ वन्यजीव व वनस्पती असलेल्या चपराळा, भामरागड अभयारण्याचा विकास अद्यापही रखडलाच आहे़ ....

Tippagad and Chaprala sanctuary | टिप्पागड व चपराळा अभयारण्य रखडले

टिप्पागड व चपराळा अभयारण्य रखडले

विकासाबाबत नियोजनच नाही : वन विभागाचेही प्रयत्न शासनदरबारी पडत आहे अपुरे
गडचिरोली : महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू किंवा देवखार (जायंट स्क्विरल) सह असंख्य दुर्मिळ वन्यजीव व वनस्पती असलेल्या चपराळा, भामरागड अभयारण्याचा विकास अद्यापही रखडलाच आहे़ या जंगलातील नक्षलवाद्यांची दहशत, वन्यजीव व सागवन तस्करांचे वर्चस्व आणि शासन स्तरावरील उदासीनतेचे ग्रहण लागल्यामुळे समृद्ध जैवविविधता लाभलेली ही अभयारण्ये केवळ नकाशावरच आहेत़
घनदाट वनराई आणि दुर्मिळ वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन व वन्यजीव संवर्धनासाठी भामरागड आणि चपराळा अभयारण्याची घोषणा करण्यात आली़ भामगराड तालुक्यातील भामरागड हे अभयारण्य अहेरी तालुक्यापासून १०२ कि़मी़ अंतरावर आहे़ १०४़ ३८ चौ़ कि़मी़ प्रदेशातील या अभयारण्यात राज्य प्राणी शेकरू, उडणारी खार, वाघ, बिबट, अस्वल, भेडकी किंवा भेकर, धनेश (ग्रेट पाईड हॉर्नबिल) अशा दुर्मिळ प्राणी, पक्ष्यांचे व आग्यामण्यार (बँडेड क्रेट) या जहाल विषारी पण, अतिदुर्मिळ सापांचे वास्तव्य आहे़ येथून पुढे सिरोंचातील नदी परिसरात जॉर्डनचा कोर्सर हा दुर्मिळ पक्षी आहे़ त्याचप्रमाणे आष्टीजवळचे चपराळा अभ्यारण्य वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे़ येथेही शेकरू, उडणारी, वाघ, बिबट व अनेक वन्यजीव, सरीसृप आहेत़ काही वर्षांपूर्वी या भागात काळवीट असल्याच्याही नोंदी आहेत़ मात्र आता ते दिसत नाहीत़ या दोन्ही अभयारण्यात वाघांचे अस्तीत्व असले, तरी ते फारसे आढळत नाहीत़ मुळात नक्षल्यांच्या भीतीने या दोन्ही अभयारण्याच्या घनदाट भागात वनाधिकारी किंवा कर्मचारी फारसे फिरत नाहीत़ हे पर्यटनासाठी उत्तम स्थळ असले, तरी पायाभूत सुविधांअभावी व नक्षल्यांच्या हिंसक घटना कानावर पडत असल्याने पर्यटकही येथे येण्यास धजावत नाहीत़ त्यांना येथे सुरक्षित वातावरण व सुविधा देण्यात शासनाला यश आले नाही़ चपराळा अभयारण्यात काही प्रमाणात पर्यटक येतात़ पण, यातील बहुतांश प्रशांतधाम मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविकच असतात़ विशेष म्हणजे या अभयारण्यातून चक्क आष्टी, अहेरी मार्ग गेला आहे़ त्यामुळे कोणतेही तस्कर या रस्त्याने अभयारण्यात सहज प्रवेश करू शकतात़ त्यामुळे येथील संरक्षण व्यवस्था कुचकामी ठरली आहे़ १९९६-९७ मध्ये या भाग पूर्ण संरक्षित करण्याासाठी नदीच्या पलीकडील व रस्त्याच्या एकाच बाजूचे वनक्षेत्र निर्धारित करण्याचे प्रयत्न झाले होते़ मात्र, त्यासाठी शासकीय नियमांमधून मार्ग काढून चिकाटीने पाठपुरावा करण्याची गरज होती़ ती चिकाटी कुणीच दाखवली नाही़ त्यामुळे हे अभयारण्य कोणत्याही दृष्टीने अभयारण्य वाटत नाही़
कोणतेही अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प विकसित होण्यासाठी पर्यटन व त्यातून आर्थिक चक्र गतिमान करणे आवश्यक आहे़ एकीकडे नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगाच्या नकाशावर झळकत असताना गडचिरोली जिल्ह्यातील ही दोन्ही अभयारण्ये अद्यापही उपेक्षितच आहेत़ (शहर प्रतिनिधी)

टिप्पागड अभयारण्य दिवास्वप्नच़़़
गडचिरोली वनविभागाने कोरची तालुक्यातील टिप्पागड येथे अभयारण्याचा प्रस्ताव पाठविला आहे़मात्र, भामरागड व चपराळा अभयारण्याची अवस्था बघता केवळ कागदोपत्री अभयारण्य घोषीत करून काहीच साध्य होणार नाही, हे माहीत असल्याने आता वनविभागानेच या अभयारण्यासाठी प्रयत्न सोडून दिले आहेत़ संरक्षित वनामुळे वन्यजीवांचे संरक्षण होऊ शकणार नाही़ उलट आज या वनांतून निर्धास्तपणे बांबू, तेंदू, मोह आदी वनोपज गोळा करणाऱ्या आदिवासींवर नियमांचे बंधन येईल़ त्यामुळे ‘नकोच ते अभयारण्य’ असा सूर उमटत आहे़

Web Title: Tippagad and Chaprala sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.