यंदाही चिखलातूनच काढावी लागणार वाट
By Admin | Updated: February 18, 2015 01:24 IST2015-02-18T01:24:37+5:302015-02-18T01:24:37+5:30
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथून सात किमी अंतरावरील अहेरी मार्गावर असलेल्या चंदनखेडी (वन) फाट्यापासून चंदनखेडी गावापर्यंत एकाच रस्त्याचे दोनदा खडीकरण करण्यात आले.

यंदाही चिखलातूनच काढावी लागणार वाट
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथून सात किमी अंतरावरील अहेरी मार्गावर असलेल्या चंदनखेडी (वन) फाट्यापासून चंदनखेडी गावापर्यंत एकाच रस्त्याचे दोनदा खडीकरण करण्यात आले. मात्र सदर काम शाळेपर्यंत न झाल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यातही चिखलातूनच वाट काढावी लागणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या वतीने १० लाख रूपयांचा निधी खर्च करून मागील वर्षी या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. ग्रामपंचायतच्या विहिरीपर्यंत मागील वर्षी काम झाले. मात्र गावातील मुख्य चौकापासून शाळेपर्यंतच्या रस्त्याची लेवल न मिळाल्याने पावसाचे पाणी शाळेकडे वाहत जाणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत ये- जा करण्यास त्रास होण्याची शक्यता आहे.
शाळेनजीकच्या एका पुलाचे बांधकामा प्रस्तावित होते. परंतु आजूबाजूला नाल्या नसल्याने ते करण्यात आले नाही, असे स्थानिक लोकांनी सांगितले. सदर काम चिंचेच्या झाडापर्यंत व्हायला पाहिजे, असेही अनेक पालकांनी प्रतिनिधीसमक्ष बोलून दाखविले. सदर काम ग्रा. प. चंदनखेडी (वन) यांच्या नावे असून सदर एजंसी काम जि. प. बांधकाम गडचिरोली यंत्रणेद्वारे चालू स्थितीत आहे. गावातील अंतर्गत काम नव्याने करणे आवश्यक होते. परंतु त्याच रस्त्यावर रवाडी व मुरूम न टाकता जुनेच काम नवीन दाखवून करण्यात आले आहे, असा आरोपही स्थानिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंत्यांनी कामाकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या अर्धवट व निकृष्ट बांधकामामुळे शासनाला लाखो रूपयांचा चुना लावण्यात आला आहे, असा आरोपही येथील पालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)