येलचिल परिसरात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:26 IST2021-02-22T04:26:12+5:302021-02-22T04:26:12+5:30
आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचिल व तोंदेल परिसर हा घनदाट जंगलाने व्याप्त आहे, शिवाय येथे पाण्याची व्यवस्था मुबलक आहे. आलापल्ली-एटापल्ली मार्गावर ...

येलचिल परिसरात वाघाची दहशत
आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचिल व तोंदेल परिसर हा घनदाट जंगलाने व्याप्त आहे, शिवाय येथे पाण्याची व्यवस्था मुबलक आहे. आलापल्ली-एटापल्ली मार्गावर दररोज शेकडो नागरिक व विद्यार्थी ये-जा करतात. एका दुचाकीस्वाराच्या मागे वाघ धावला असल्याचे त्याने गावकऱ्यांना सांगितले. तसेच बसमधून येताना शालेय विद्यार्थ्यांनाही वाघ दिसल्याची माहिती त्यांनी आपल्या पालकांना दिली. येलचिल गावातील एका शेतकऱ्याच्या बैलाला वाघाने ठार मारल्याची माहिती आहे. जंगलात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही वाघाच्या पायाचे ठसे दिसल्याची माहिती आहे. मात्र अद्याप वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये तो वाघ टिपल्या गेला नाही. वेलगूर परिसरातील नवेगावलगत शेतात वाघ बघितल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मात्र तो वाघ आहे की बिबट, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांनी शेतातील रात्रीची जागल साेडून घरीच झोपणे सुरू केले आहे. सध्या तरी कोणत्या इसमावर वाघाने हल्ला केला नाही. मात्र लोकांच्या मनात भीती पसरली आहे.
कोट...
वाघ दिसल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ट्रान्झिट काळामध्ये वाघ एकीकडून दुसरीकडे जात असतो. जंगलमार्गे तेलंगणा परिसरातून वाघ महाराष्ट्रात ये-जा करीत असतात. बिबटचा वावरही या परिसरात आहे. मात्र हा नेमका वाघ आहे की बिबट, हे आताच सांगता येणार नाही. वनविभागातर्फे कॅमेरे लावण्यात आले आहेत. अधिकृत माहिती नंतर देता येईल. वनरक्षक किंवा वनपालांनी अद्याप कोणती माहिती दिली नाही. बैलाला ठार केल्याची माहिती आमच्याकडे आली असून, पंचनामा करून चौकशी सुरू आहे.
- पी. आर. जवरे, वन परिक्षेत्राधिकारी, पीडीगुडम क्षेत्र.