आरमाेरी तालुक्यात वाघ मृतावस्थेत आढळला; वडसा वन विभागात वन्यप्राणी मृत्यूचे सत्र सुरूच
By गेापाल लाजुरकर | Updated: December 10, 2025 21:17 IST2025-12-10T21:17:30+5:302025-12-10T21:17:30+5:30
गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील विहीरगाव नियत क्षेत्रात साेमवार, ८ डिसेंबर राेजी एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वडसा वन ...

आरमाेरी तालुक्यात वाघ मृतावस्थेत आढळला; वडसा वन विभागात वन्यप्राणी मृत्यूचे सत्र सुरूच
गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील विहीरगाव नियत क्षेत्रात साेमवार, ८ डिसेंबर राेजी एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वडसा वन विभागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहेत. वाघाचा मृतदेह अत्यंत विकृत अवस्थेत असल्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.
विहीरगाव नियत क्षेत्रात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. तेव्हा वडसाचे उपवनसंरक्षक वरुण बी. आर., सहायक वनसंरक्षक आर. एस. सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण बडोले यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूची खरी कारणमीमांसा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, वडसा वन विभागात यापूर्वी दाेन बिबटे मृतावस्थेत आढळले हाेते. आता आरमोरी तालुक्याच्या जंगल परिसरात वाघ मृतावस्थेत आढळल्याने वन्यजीव प्रेमींमध्येही चिंता निर्माण झाली आहे.
वाघाची शिकार तर झाली नाही ना?
वनविभागाने वाघाचा मृत्यू संशयास्पद नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, वाघाने शिकार केलेल्या जनावरांवर विषप्रयाेग करून वाघाची शिकार तर झाली नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी शवविच्छेदनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. दीपा ढवंडे,डॉ. अभिषेक सोनटक्के, डॉ. मृणाल टोंगे, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे तसेच वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने यांना पाचारण करण्यात आले हाेते.