पोलिसांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारूविक्रेत्यांना तीन वर्षांचा कारावास
By Admin | Updated: August 19, 2016 00:51 IST2016-08-19T00:51:25+5:302016-08-19T00:51:25+5:30
दारुची अवैध वाहतूक करताना अटकाव करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न

पोलिसांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारूविक्रेत्यांना तीन वर्षांचा कारावास
जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : पोलीस वाहनाला दिली होती धडक
गडचिरोली : दारुची अवैध वाहतूक करताना अटकाव करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गडचिरोली येथील दोन दारुविक्रेत्यांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी ३ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अर्जुन अरुण शिल व राजू विठ्ठल कंटकवार अशी दोषी इसमांची नावे आहेत.
२३ सप्टेंबर २०१० रोजी आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.बी.माने हे आपल्या सहकाऱ्यांसह आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीजवळ गस्त घालत होते. यावेळी त्यांना ब्रह्मपुरीकडून मारुती ८०० हे वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करुन मारुती कार थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालक कार पुढे घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी आपले वाहन मारुती कारसमोर नेऊन कार पुन्हा थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. यामुळे दोन्ही वाहने उलटली. काही वेळानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय देशमुख यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या सहकार्याने दोन्ही वाहने सरळ केली. यावेळी मारुती कारमध्ये २० पेट्या देशी दारु आढळून आली. शिवाय कारमधील अर्जुन शिल व राजू कंटकवार हे जखमी झालेले दिसले. पोलिसांनी दारु ताब्यात घेऊन दोन्ही जखमींना रुग्णालयात भरती केले. त्यानंतर शिपाई नरेंद्र बांबोळे यांच्या फियार्दीवरुन पोलीस उपनिरीक्षक विजय देशमुख यांनी दोन्ही आरोपींवर भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ४२७, ३४ व मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ड), ८३ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढे हे प्रकरण न्यायालयात वर्ग करण्यात आले. बुधवारी १७ आॅगस्ट रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सर्व साक्ष व पुरावे तपासून आरोपी अर्जुन शिल व राजू कंटकवार यांना भादंवि कलम ३५३ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा आणि मुंदाका कलम ६५ (१) (ड) अन्वये २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांची अतिरिक्त शिक्षा, मुंदाका कलम ८३ अन्वये २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड ठोठावला.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय नितीन शिंदे व पोलीस नाईक अरविंद पेंदाम यांनी जबाबदारी सांभाळली. (नगर प्रतिनिधी)