तीन वर्षांपासून कलवट दुर्लक्षित
By Admin | Updated: May 11, 2015 01:20 IST2015-05-11T01:20:33+5:302015-05-11T01:20:33+5:30
देवलमरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या नंदीगाव येथील मुख्य मार्गावर असलेला कलवट पूल मागील तीन वर्षांपूर्वी खचला.

तीन वर्षांपासून कलवट दुर्लक्षित
गुड्डीगुडम : देवलमरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या नंदीगाव येथील मुख्य मार्गावर असलेला कलवट पूल मागील तीन वर्षांपूर्वी खचला. मात्र या पुलाच्या दुरूस्तीकडे ग्राम पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे.
नंदीगाव येथील कलवट तीन वर्षांपूर्वी खचला. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला. पावसाळ्यात या खड्ड्याने विस्तारित रूप धारण केल्याने तो अधिकच भयावह झाला. परिणामी या मार्गाने ये- जा करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता येथे वाढले आहे. पायी ये- जा करणाऱ्या नागरिकांनाही येथे अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील अनेक विकास कामे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडलेली आहेत. येथे वीज, पाणी, रस्ते आदी समस्यांचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. सदर भाग दुर्गम क्षेत्रात येत असल्याने येथील विकास करण्याकडे लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. शासनाच्या अनेक सोयी- सुविधाही गावात पोहोचू शकत नाही. जुन्या ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी खड्ड्याची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणुकीद्वारे नियुक्ती झाल्याने गावाच्या विकासाकडे लक्ष देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलवट पुलाचे बांधकाम नव्याने त्वरित करावे, अशी मागणी संदीप दुर्गे, रमेश सोयाम, लालू चालूरकर, हरिष गावडे, प्रकाश मेश्राम यांनी केले आहे. (वार्ताहर)