चामोर्शी व सिरोंचात थ्री-जी सेवा लवकरच

By Admin | Updated: January 31, 2015 01:36 IST2015-01-31T01:36:59+5:302015-01-31T01:36:59+5:30

चामोर्शी येथे थ्री-जी सेवेची यंत्रणा लावण्याचे काम सुरू झाले आहे. तर चामोर्शी येथील काम आटोपताच सिरोंचा येथेही थ्री-जी सेवीची यंत्रणा लावली जाणार आहे.

Three-way service in Chamorshi and Sironchh | चामोर्शी व सिरोंचात थ्री-जी सेवा लवकरच

चामोर्शी व सिरोंचात थ्री-जी सेवा लवकरच

गडचिरोली : चामोर्शी येथे थ्री-जी सेवेची यंत्रणा लावण्याचे काम सुरू झाले आहे. तर चामोर्शी येथील काम आटोपताच सिरोंचा येथेही थ्री-जी सेवीची यंत्रणा लावली जाणार आहे. त्यामुळे या दोन तालुक्यात थ्री-जी सेवेचा शुभारंभ लवकरच होण्याची शक्यता बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात थ्री-जी सेवा पुरविणारी बीएसएनएल ही एकमेव कंपनी आहे. बीएसएनएलचे गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. नागरिकांकडे स्मार्ट फोनची संख्या वाढत चालली असल्याने थ्री-जी सेवेची मागणीसुद्धा वाढत चालली आहे. गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलची थ्री-जी सेवा सध्य:स्थित गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी, अहेरी या तालुक्यात कार्यरत आहे. चामोर्शी हा जिल्ह्यातील सर्वात विकसित व लोकसंख्येने जास्त असलेला तालुका मानला जातो. तर सिरोंचा दक्षिणेकडील सर्वात शेवटचा तालुका आहे. या दोन्ही तालुक्यात थ्री-जी सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. नागरिकांना सेवा पुरविण्याबरोबरच बीएसएनएलला उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे, यासाठी चामोर्शी व सिरोंचा येथे थ्री-जी सेवा बसविण्यास बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाने मंजुरी दिली व सहा महिन्यांपूर्वीच या ठिकाणी थ्री-जी सेवेसाठी आवश्यक असलेले साहित्य आणून ठेवले. सामान कार्यालयात दाखल झाले असले तरी ते बसविण्यात आले नसल्याने नागरिकांनी सदर साहित्य तत्काळ लावून थ्री-जी सेवा सुरू करावी, अशी मागणी लावून धरली होती.
बीएसएनएलने सदर साहित्य लावून थ्री-जी सेवा सुरू करण्यासाठी अभियंते पाठविले आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून चामोर्शी येथे थ्री-जी सेवा बसविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चामोर्शी परिसरात थ्री-जी सेवा आठ दिवसांच्यापूर्वीच सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चामोर्शी येथील थ्री-जी सेवा बसविण्याचे काम आटोपल्यानंतर हेच अभियंते पुढे सिरोंचा येथेही जाणार आहेत. सिरोंचा येथे थ्री-जी सेवा १५ ते २० दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
मोबाईल व डाटाकार्डच्या सहाय्याने इंटरनेट सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी थ्री-जी सेवा अत्यंत आवश्यक आहे. टू-जी सेवा असली तरी इंटरनेट सुरू होते. मात्र आवश्यक तेवढा वेग पकडत नाही. त्यामुळे थ्री-जी सेवा अत्यंत गरजेची आहे. बीएसएनएल व्यतिरिक्त इतर कोणत्याही कंपनीची थ्री-जी सेवा उपलब्ध नसल्याने मोबाईलधारक बीएसएनएलचेच सीम खरेदी करतात. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Three-way service in Chamorshi and Sironchh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.