सिरोंचात तीन दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 01:12 IST2016-04-23T01:12:34+5:302016-04-23T01:12:34+5:30
येथील नगर पंचायत मालकीच्या चाळीतील श्रावणी केबल नेटवर्क लोकल केबलच्या दुकानाला (कंट्रोल रूम) २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागली.

सिरोंचात तीन दुकाने जळून खाक
शॉर्टसर्किटने आग : १८ लाख रूपयांचे नुकसान
सिरोंचा : येथील नगर पंचायत मालकीच्या चाळीतील श्रावणी केबल नेटवर्क लोकल केबलच्या दुकानाला (कंट्रोल रूम) २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत या दुकानांबरोबरच चाळीतील इतर दोन दुकानातीलही साहित्य जळून खाक झाले. यामध्ये १८ लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
सिरोंचा येथील नगर पंचायतीच्या चाळीत श्रावणी केबल नेटवर्कचे दुकान आहे. या दुकानात सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. दुकानातील साहित्य जळण्यास सुरुवात झाली. त्याचा धूर दुकानाच्या व्हॅन्टीलेटरमधून निघत असल्याचे दिसून आले. सिरोंचा येथील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. संबंधित दुकानदाराला फोन करून याबाबतची सूचना दिली. पोलीस स्टेशनलाही कळविण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. शटर उघडताच आगीचे डोंब बाहेर येण्यास सुरुवात झाली.
युवकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. याच चाळीतील इतर दोन दुकाने साईकृपा टेलिकॉम स्टेशनरी व समीर सेलेक्शन्स रेडिमेड गारमेन्टस या दुकानांनाही आग लागली. श्रावणी केबल हे दुकान सीतापती लक्ष्मीनारायण गट्टुवार यांच्या मालकीचे आहे. या दुकानाचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. साईकृपा टेलिकॉम स्टेशनरीचे २ लाख १५ हजार रूपयांचे नुकसान झाले. सदर दुकान राजेश डोनय्या अंकम यांच्या मालकीचे आहे. तर समीर सेलेक्शन रेडिमेड गारमेन्टस दुकान लोकनाथम राजाराम अरिगेलवार यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या दुकानाचे १ लाख १० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यादरम्यान लक्षात आले.
माहिती मिळताच तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार, मंडल अधिकारी मंडावार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, ठाणेदार दीपक लुडके, पीएसआय कदम, दाबाळे, काटपे, नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, बांधकाम सभापती ईश्वरम्मा बुद्धावार, नगरसेवक सतीश भोगे, वीज कंपनीचे आवारी, पेटकर घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाच्या मार्फतीने सिरोंचाचे तलाठी गजभिये व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.
आग विझविण्यासाठी संदीप राचर्लावार, रवी चकिनारपुवार, रिजवान शेख, अश्विन अरगेला, इतायत अली, रणजीत गागापुरपू, संदीप पेंदोटी यांच्यासह सिरोंचा शहरातील युवक, महिला व नागरिकांनी सहकार्य केले. दुकानदारांना मदत देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
गावकरी व वन विभागाचे सहकार्य
आग लागली असल्याचे लक्षात येताच याबाबतची माहिती गावातील युवकांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे उपवनसंरक्षक रघुनाथ शुक्ला यांच्या निर्देशानंतर वनपाल तुम्मावार यांनी पाण्याचे टँकर आणले व आग विझविण्यात आली. त्यामुळे वेगाने पसरणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविता येणे शक्य झाले. सिरोंचा हा गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका असल्याने या तालुक्यासाठी अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.