सुटे भाग चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश : तिघांना अटक
By Admin | Updated: May 8, 2015 01:35 IST2015-05-08T01:35:07+5:302015-05-08T01:35:07+5:30
छत्तीसगडमधून चारचाकी वाहनांचे चोरी केलेले सुटे भाग विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राजनांदगाव येथील क्राईम ब्रँचने पदार्फाश केला

सुटे भाग चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश : तिघांना अटक
कुरखेडा : छत्तीसगडमधून चारचाकी वाहनांचे चोरी केलेले सुटे भाग विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राजनांदगाव येथील क्राईम ब्रँचने पदार्फाश केला असून, कुरखेडा व गोठणगाव येथील तिघांना अटक केली आहे. याशिवाय सुमारे ७ लाख रुपये किमतीची वाहनेही जप्त केली आहेत.
अली महंमद अंसारी रा.कुरखेडा, अयाज बशीर शेख व अतिक बशीर शेख दोघेही रा.गोठणगाव अशी आरोपींची नावे आहेत. काल राजनांदगावच्या क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक के.एम.खान यांनी कुरखेडा येथे अकस्मात धाड टाकून अली महमद अंसारी यास अटक करुन त्याच्या टायर वर्क्सच्या दुकानातून टायर, बॅटऱ्या व अन्य साहित्य जप्त केले होते. तत्पूर्वी अयाज बशीर शेख व अतिक शेख यांना अटक करण्यात आली होती. राजनांदगाव क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राजनांदगाव जिल्हयातील डोंगरगाव, अंबागड चौकी, मैदाटोला, छुरिया आणि मालोद जिल्हयातील डौडीलोहारा व डौडी गावांतील चारचाकी वाहनांचे टायर व अन्य सुटे भाग चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. राजनांदगाव जिल्हयात अशी २५, तर मालोद जिल्हयात ७ प्रकरणांची नोंद पोलिसांकडे होती. ही मोठी टोळी असल्याचा संशय आल्याने राजनांदगावचे पोलिस अधीक्षक सुंदरराज पी.के. यांनी या प्रकरणाचा तपास राजनांदगाव क्राईम ब्रँचकडे सोपविला. त्यानंतर क्राईम ब्रँचचे पोलिस उपअधीक्षक सचिनदेव शुक्ला यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक के,एम.खान यांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.