तीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
By Admin | Updated: June 10, 2016 01:30 IST2016-06-10T01:30:08+5:302016-06-10T01:30:08+5:30
रेती घाटाच्या कामात कुचराई करणाऱ्या जिल्ह्यातील दोन तहसीलदारांसह एका उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली.

तीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
रेती घाटाच्या कामात कुचराई : बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गडचिरोली : रेती घाटाच्या कामात कुचराई करणाऱ्या जिल्ह्यातील दोन तहसीलदारांसह एका उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली.
महसूल अधिकाऱ्यांच्या नियमित आढावा बैठकीत विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी नायक यांनी घेतला. या बैठकीत गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर व आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांनी रेती घाटाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले. तसेच देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे हे देखील समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. त्यामुळे या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी गुरूवारी दिले.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, राममूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक तहसीलदारांनी रेती घाट प्रस्तावित केले आहे. मात्र त्यांच्या आकारात तफावत आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा सर्वेक्षण करून पुरवणी प्रस्ताव तयार करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले.
यंदा रेती घाटाचे सर्वेक्षण करताना जीपीएसची मदत घेतली जाणार आहे. तांत्रिक सक्षमतेसह प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी सादर करावे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून निर्णय घेता प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून तपासणी करून जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश नायक यांनी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)