तीन महिन्यांचे मानधन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:48 IST2017-02-07T00:48:33+5:302017-02-07T00:48:33+5:30
शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून वाढण्याचे काम करणाऱ्या अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासूनचे मानधन रखडले आहे.

तीन महिन्यांचे मानधन रखडले
प्रशासनाचे दुर्लक्ष : शापोआ कर्मचाऱ्यांच्या पंचायत समितीत येरझारा
अहेरी : शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून वाढण्याचे काम करणाऱ्या अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासूनचे मानधन रखडले आहे. सदर मानधन मिळावे, याकरिता शापोआ कर्मचारी वारंवार पंचायत समितीला येरझारा मारत आहेत. मात्र त्यांचे मानधन निकाली काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन मागील तीन महिन्यांपासून रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे मानधन तत्काळ निकाली काढावे, या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. सोमवारी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठून तीन महिन्यांच्या मानधनाविषयी विचारणा केली असता, आमच्याकडे मानधन व इंधन खर्च उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आम्ही बँकेला डीडी पाठविला नाही, असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम नियमित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनियमित मानधन दिले जाते. शासनस्तरावरून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून रखडलेले मानधन तत्काळ निकाली काढून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष भिमन्ना तालावार, तालुका सचिव गणेश चापले, कार्याध्यक्ष किशोर मडावी, कर्मचारी कोडापे, मंदा मांडरे, शकुंतला गुरनुले यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)