एक एकरात तीन लाखांची मिरची
By Admin | Updated: January 18, 2017 01:41 IST2017-01-18T01:41:47+5:302017-01-18T01:41:47+5:30
येथील प्रगतशील शेतकरी मारोती कवडू बारसागडे यांनी एक एकर शेतात मिरची पिकाची लागवड केली असून यातून तीन लाख रूपयांपेक्षा

एक एकरात तीन लाखांची मिरची
तळोधी मो. येथील शेतकरी : आधुनिक पद्धतीने लागवड
मिलिंद मेडपिलवार तळोधी मो.
येथील प्रगतशील शेतकरी मारोती कवडू बारसागडे यांनी एक एकर शेतात मिरची पिकाची लागवड केली असून यातून तीन लाख रूपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सव्वा लाख रूपयांची हिरवी मिरची त्यांनी आजपर्यंत विकली आहे.
मारोती बारसागडे यांची पौर नदी व वैनगंगा नदीच्या तिरावर साडेचार एकर शेती आहे. त्यापैकी एक एकर शेतीवर त्यांनी मिरची पिकाची लागवड केली. सदर मिरचीेचे उत्पादन आधुनिक पद्धतीने त्यांनी घेण्यास सुरुवात केली. संकरित पद्धतीच्या मिरचीची त्यांनी लागवड केली. मिरचीचे झाड जवळपास ४ फूट उंच वाढली आहेत. अगदी झाडाच्या देठापासून तर शेंड्यापर्यंत मिरच्या लागल्या आहेत. प्रत्येक झाडाला जवळपास एक किलो मिरची लागली आहे. आजपर्यंत त्यांनी एक लाख २५ हजार रूपयांची मिरची बाजारात विकली आहे. मिरचीबरोबरच बारसागडे यांनी टमाटर, कोबी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. शेतामध्ये चिकू, आंबा, चिंच पिकाचेही ते उत्पादन घेतात. पावसाळ्यामध्ये धानपिकाचीही लागवड केली जाते. विशेष म्हणजे १५ वर्षाअगोदर मारोती बारसागडे यांचे वडील कवडू बारसागडे यांनी बागायतीच्या उत्पन्नास सुरुवात केली. त्यावेळी या परिसरात धाना व्यतीरिक्त इतर पीक घेतले जात नव्हते. कवडू बारसागडे हे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत होते. त्यांचे प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.