शिवनगरवासीयांना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:46 IST2019-04-24T23:45:39+5:302019-04-24T23:46:58+5:30
चामोर्शी मार्गावरील कैकाडी समाज वस्तीच्या मागील बाजुस देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ च्या बाजुला शासकीय जागेवर वस्ती करून राहत असलेल्या शिवनगरातील नागरिकांना माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी वस्ती रिकामी करण्याची मागणी केली.

शिवनगरवासीयांना जीवे मारण्याची धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील कैकाडी समाज वस्तीच्या मागील बाजुस देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ च्या बाजुला शासकीय जागेवर वस्ती करून राहत असलेल्या शिवनगरातील नागरिकांना माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी वस्ती रिकामी करण्याची मागणी केली. वस्ती रिकामी न केल्यास वस्तीवर बुलडोजर चालविण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप शिवनगरातील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
शिवनगर येथील नागरिकांनी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यानिमित्त ध्वज उभारण्यात आला होता. २३ एप्रिल रोजी अमिता मडावी या जवळपास ५० नागरिकांना सोबत घेऊन शिवनगरात आल्या. त्यांनी जयंतीनिमित्त लावलेल्या झेंड्याचा अवमान केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणी मडावी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.
दोन दिवसात झोपडपट्टी रिकामी न केल्यास झोपेत बुलडोजर चालविण्याची धमकीही नागरिकांना दिली असल्याचा आरोप केला आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी व इतर अधिकारी माझ्या फोनवर आपली सर्व कामे सोडून माझे काम करतात, असा दम त्यांनी भरल्याचा आरोपही नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शिवनगरातील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.
आपल्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली. घटनेच्या दिवशी वन विभागाचे अधिकारी, सर्वेअर व जमीन मालक उपस्थित होते. आपण कोणालाही शिविगाळ केली नाही किंवा ध्वजाचा अपमान केला नाही. शेतकऱ्यांना सातबारा मिळाला आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे पितळ उघडे पडल्याने असे आरोप करीत आहेत.
- अमिता मडावी, गडचिरोली