तीन हजारांवर शौचालयाला प्रारंभ नाही
By Admin | Updated: February 21, 2016 00:43 IST2016-02-21T00:43:00+5:302016-02-21T00:43:00+5:30
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाने एकूण १३ हजार ५५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले.

तीन हजारांवर शौचालयाला प्रारंभ नाही
लाभार्थ्यांची प्रचंड अनास्था : स्वच्छ भारत मिशनमधील १ हजार १९२ शौचालय अपूर्ण
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाने एकूण १३ हजार ५५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले. दहा महिन्याचा कालावधी उलटूनही रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याच्या टंचाईमुळे तीन हजारवर शौचालयाच्या बांधकामाला अद्यापही सुरुवातच झाली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १ हजार १९२ घरकुले अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्हा १०० टक्के गोदरीमुक्त करण्यासाठी प्रशासनापुढे मोठे आवाहन आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात उद्दिष्टाइतकेच १३ हजार ५५ शौचालय बांधकामाला मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत ६ हजार ८७८ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून १ हजार १९२ शौचालय अपूर्णस्थितीत आहेत. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षामार्फत वारंवार पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाला शौचालय बांधकाम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र लाभार्थ्यांच्या अनास्थेमुळे जिल्ह्यात शौचालय बांधकामाचा वेग मंदावला असल्याचे दिसून येते. अहेरी तालुक्यात एकूण ९६३ शौचालय मंजूर करण्यात आले. यापैकी आतापर्यंत ३११ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून १७३ शौचालयाचे काम अपूर्ण आहेत. आरमोरी तालुक्यात १ हजार २४३ शौचालयांपैकी ५६६ शौचालयांचे काम पूर्ण झाले असून ७९ शौचालय अपूर्णस्थितीत आहेत. भामरागड तालुक्यात २७१ मंजूर शौचालयापैकी ९५ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून ६४ शौचालयाचे काम अपूर्ण आहेत.
चामोर्शी तालुक्यात ८८६ मंजूर शौचालयांपैकी ५५९ शौचालयांचे काम पूर्ण झाले असून १५३ शौचालयाचे काम अपूर्ण आहेत. धानोरा तालुक्यात ५४१ शौचालयांपैकी ३५५ शौचालयांचे काम पूर्ण झाले असून ४० शौचालयाचे काम अपूर्णस्थितीत आहेत. एटापल्ली तालुक्यात ५६० शौचालयांपैकी २२४ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून ७० शौचालय अपूर्णस्थितीत आहेत. गडचिरोली तालुक्यात २ हजार २६० शौचालयांपैकी १ हजार ५४ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. ५० शौचालय अपूर्ण आहेत. कुरखेडा तालुक्यात १ हजार ७५० पैकी ८७० शौचालयांचे काम पूर्ण झाले असून ४४ शौचालय अपूर्ण आहेत. मुलचेरा तालुक्यात १ हजार ११७ पैकी ४४१ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून २०५ शौचालयाचे काम अपूर्णस्थितीत आहेत. देसाईगंज तालुक्यात २ हजार ५२५ शौचालयापैकी १ हजार ५३४ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. अद्यापही २६७ शौचालय अपूर्णस्थितीत आहेत. यापूर्वी योजनेतून बांधण्यात आलेल्या शौचालयाचा कुटुंबातील व्यक्ती वापर करीत नसल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)
आधी काम पूर्ण करा, नंतर अनुदानाची रक्कम न्या
शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्याला केंद्र व राज्य शासनाकडून १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. मात्र पहिल्या हप्त्याचे अग्रीम म्हणून अनुदानाची रक्कम दिल्यानंतर लाभार्थी शौचालय बांधकामाला सुरुवात करीत नाही. त्यामुळे जि. प. प्रशासनाने लाभार्थ्याने आधी शौचालयाचे काम पूर्ण करावे, नंतर अनुदानाची पूर्ण रक्कम घेऊन जावे, असे धोरण घेतले आहे. ३१ मार्च २०१६ पूर्वी शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहे.
तीन तालुके माघारले
१ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात जवळपास ४ हजार ९०० शौचालयांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील सर्वाधिक १ हजार १५६, कुरखेडा तालुक्यातील ८३६, मुलेचरा तालुक्यातील ४७१, अहेरी तालुक्यातील ४७९ व आरमोरी तालुक्यातील ५९८ तसेच देसाईगंज तालुक्यातील २२४ शौचालयांचा समावेश आहे. शौचालय बांधकामात गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा हे तीन तालुके प्रचंड माघारले असल्याचे दिसून येते.
कोरची, सिरोंचा तालुका आघाडीवर
कोरची तालुक्यात मंजूर ५१२ शौचालयापैकी ४९२ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून केवळ १२ शौचालयाचे काम अपूर्ण आहेत. सिरोंचा तालुक्यात मंजूर ४२७ पैकी ३७७ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून केवळ ३५ शौचालयाचे काम अपूर्ण आहेत. जिल्ह्यात इतर दहा तालुक्याच्या तुलनेत कोरची व सिरोंचा तालुक्याने शौचालय बांधकामात वेग घेतला आहे. हे दोनच तालुके शौचालय बांधकामात आघाडीवर असल्याचे दिसून येते.