हक्कासाठी हजारो नागरिक रस्त्यावर
By Admin | Updated: August 29, 2015 00:04 IST2015-08-29T00:04:19+5:302015-08-29T00:04:19+5:30
कोरची तालुक्यातील विविध प्रलंबित समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोरची तालुका सरपंच संघटनेच्या वतीने ...

हक्कासाठी हजारो नागरिक रस्त्यावर
कोरचीत चक्काजाम आंदोलन : तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांशी चर्चा
कोरची : कोरची तालुक्यातील विविध प्रलंबित समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोरची तालुका सरपंच संघटनेच्या वतीने शुक्रवारला चक्काजाम आंदोलन करण्यात आला. दरम्यान हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात नारेबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व कोरची तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सीयाराम हलामी, सचिव हेमंत मानकर, कोषाध्यक्ष राजेश नैताम व मसेलीचे माजी उपसरपंच प्रतापसिंह गजभिये यांनी केले.
दरम्यान आंदोलनस्थळी कोरचीचे तहसीलदार पोहोचले. यावेळी सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांशी चर्चा केली.
यावेळी नंदकिशोर वैरागडे, रामसुराम काटेंगे व दोन हजारावर अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते. सकाळी ११ वाजतापासून या आंदोलनाला सुरूवात झाली. प्रशासकीय अधिकारी न आल्यामुळे सात तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी व सरकारी यंत्रणेतील स्थानिक अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी १० समस्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर समाधानकारक चर्चा झाल्याने सात तासाने चक्काजाम आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनादरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)
या आहेत निवेदनातील मागण्या
कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, तालुक्यातील कोटगल येथे मंजूर असलेल्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम पूर्ण करण्यात यावे, बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम गतीने पूर्ण करावे, मानव विकास मिशन अंतर्गत कोरची तालुक्यासाठी बस सेवा सुरू करावी, तालुक्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर आॅईल इंजिनवर वीजपंप पुरविण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.