काँग्रेसकडे हजार जणांनी मागीतली उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 02:05 IST2017-01-19T02:05:33+5:302017-01-19T02:05:33+5:30
५१ जिल्हा परिषद क्षेत्र व १०२ पंचायत समिती गणासाठी काँग्रेसकडे १ हजार १५० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

काँग्रेसकडे हजार जणांनी मागीतली उमेदवारी
मुलाखती पार पडल्या : एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार- वडेट्टीवार
गडचिरोली : ५१ जिल्हा परिषद क्षेत्र व १०२ पंचायत समिती गणासाठी काँग्रेसकडे १ हजार १५० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी स्थानिक सुप्रभात मंगल कार्यालयाच्या सभागृहात पार पडल्या.
यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी खा. मारोतराव कोवासे, पक्षाचे गडचिरोली जिल्हा निरीक्षक सुरेश भोयर, जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, आरमोरी क्षेत्राचे निरीक्षक डॉ. योगेंद्र भगत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र दरेकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश इटनकर, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी १२ तालुक्यातील ५१ जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी काँग्रेसकडे ४०० उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहे. तर पंचायत समितीच्या १०२ गणासाठी ७५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात आल्या. जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नावावर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली असलेली पाच सदस्यीय जिल्हास्तरीय छाननी समिती निर्णय घेणार आहे. त्यानंतर सदर यादी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पार्लमेंट्री बोर्डाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर २४ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीकरिता मतभेद विसरून पक्षाचे सर्व नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळणार असल्याचे आ. विजय वडेट्टीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एका मतदार संघात चार पेक्षा अधिक उमेदवारांची नावे इच्छुक म्हणून आलेली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. काँग्रेस पक्षाला गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचे माजी खा. मारोतराव कोवासे यावेळी म्हणाले.