काटेरी कुंपण केले : सरपंचासह शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By Admin | Updated: July 28, 2016 02:07 IST2016-07-28T02:07:35+5:302016-07-28T02:07:35+5:30
अहेरी तालुक्यातील महागाव येथील शेतकरी लचमा बंडू झाडे यांनी शेताकडे जाणाऱ्या वहिवाटेच्या रस्त्यावर काटेरी कुंपन करून रस्ता बंद केला.

काटेरी कुंपण केले : सरपंचासह शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
अहेरी : अहेरी तालुक्यातील महागाव येथील शेतकरी लचमा बंडू झाडे यांनी शेताकडे जाणाऱ्या वहिवाटेच्या रस्त्यावर काटेरी कुंपन करून रस्ता बंद केला. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून सर्वे नं. १२६, १९६, २०१ सह लगतच्या सर्वे नं. मधील शेतकऱ्यांची धानपीक रोवणीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतीकडे जाणारा सदर वहिवाटेचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी महागाव बुज येथील सरपंचासह ११ शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, तहसीलदार अहेरी यांच्या आदेशानुसार महागाव बुज येथील सर्वे नं. १९५ मधून जाणारा रस्ता कायम करण्यात आला आहे. मात्र लचमा बंडू झाडे यांनी काटेरी कुंपन करून सदर रस्ता बंद केला. त्यामुळे सर्वे नं. १२६, १९६, २०१, ४७२, ४७५, १९७, ३१५, ४८१, ४६४, ३१६, ३१८, ४९५, ५१८, ३३२, ३१२ व ३३३ मधील शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास अडचण निर्माण झाली आहे. सध्या धान पिकाच्या रोवणीचा हंगाम आहे. मात्र रस्ता बंद करून वाद घालण्यात आल्यामुळे वरील सर्वे क्रमांकमधील शेतकऱ्यांच्या शेतातील रोवणीची कामे थांबली आहेत. परिणामी या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी तहसील कार्यालयामार्फत पोलीस विभागाच्या सहकार्याने सदर रस्ता मोकळा करून देण्यात आला. मात्र लचमा झाडे यांनी पुन्हा अतिक्रमण करून काटेरी कुंपनाद्वारे सदर रस्ता बंद केला. त्यानंतर पुन्हा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. याप्रकरणाची मंडळ अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यानंतर २० जुलै २०१६ रोजी सदर रस्ता दुसऱ्यांदा मोकळा करून देण्यात आला. त्याच दिवशी लचमा झाडे यांनी आदेशाची अवहेलना करून सदर रस्ता बंद केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी आता पुढाकार घेऊन सदर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अन्यथा अहेरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा तक्रारकर्ते अन्यायग्रस्त शेतकरी नामदेव अलोणे, विठ्ठल दुर्गे, श्रीनिवास अलोणे, ओकू करमे, किसन गर्गम, श्रीकांत चालुरकर, नारायण पानेम, मदना पानेम, वीणा मट्टीवार, दलपती अलोणे व नारायण नरोटे आदींनी प्रशासनाला दिला आहे. (प्रतिनिधी)